उध्दव ठाकरेंवर टीका कराल, तर बारामतीच्या घरी बसवू; विजय शिवतारेंचा सुप्रिया सुळे,अजित पवारांना इशारा    

0
510

माळशिरस दि. २७ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करण्यापूर्वी आधी आपण कोण आहोत, हे पाहावे. यानंतर उध्दव ठाकरे यांच्यावर काही बोलाल, तर दिल्लीऐवजी बारामतीतील घरी बसवू, असा इशारा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना दिला.

ज्यांना स्वत:च्या वडिलांचे स्मारक पाच वर्षात बांधता आले नाही, ते काय राम मंदिर बांधणार? अशी बोचरी टीका अजित पवार यांनी केली होती. तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी खिशात फाटलेले राजीनामे आता बाहेर काढावेत, अशी  खोचक टीका सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेवर केली होती. या टीकेला शिवतारे यांनी पुरंदर तालुक्यातील वाघापूर येथे पत्रकरांशी बोलताना उत्तर दिले.

यावेळी शिवतारे म्हणाले की, २०१४च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून मी शिवसेना –भाजप युतीचा उमेदवार असतो, तर निकाल काय लागला असता हे वेगळे सांगायला नको. माझ्यामुळे सुप्रिया सुळे या लोकसभेला विजय झाल्या आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे. पवार साहेबांची कन्या या व्यतिरिक्त आपले काय कर्तृत्व? पवार यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चांगले संबंध होते, म्हणूनच सुप्रिया सुळे या पहिल्यांदा राज्यसभेत निवडणून गेल्या होत्या, याचीही आठवण त्यांनी यावेळी करून दिली.