अभिमानास्पद गोष्ट मुलांना शाळेत घालताना बापाचे नाव लावावे लागते. ते रामभाऊंनी दिल

0
746

नागपूर, दि.१ (पीसीबी) – नागपुरातील गंगा-जमना या वेश्यांच्या वस्तीतील सकाळच शिवीगाळ, भांडणे, मारामाऱ्यांनी सुरू होणारी.. १९८०च्या सुमारास जांबुवंतराव धोटे यांनी वेश्यांच्या पुनर्वसनासाठी मोहीम सुरू केली. या मोहिमेत राम इंगोले नावाचा एक सामान्य माणूसही सामील झाला होता. वस्तीतील महिला अनिच्छेने, अगदीच नाइलाजाने, बळजबरीने आणि अगदी थोड्या स्वच्छेने या व्यवसायात उतरल्या आहेत. यातून अनेक वेश्या गरोदर राहतात. त्यांना मुले होतात. मुलगी असेल तर तिला सरळ धंद्यात उतरवले जाते. मुलगा असेल तर तो एकतर दलाल बनतो नाहीतर गुन्हेगारीचे जग त्याच्यासाठी मोकळे असते. या मुला-मुलींचा शिक्षणाचा आणि चांगल्या संस्कारांचा काहीच संबंध येत नाही. या वस्तीत फिरताना राम इंगोलेंना ही समस्या जाणवली. निरागस मुला-मुलींचे चेहरे पाहिल्यानंतर या निरागसांनी वाईट धंद्यात का उतरावे, त्यांच्यासाठी आयुष्याचे काहीच ध्येय नाही का, हा प्रश्न त्यांना सतत छळू लागला. या व्यावसायिक देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलाबाळांसाठी आपण काहीतरी करू शकतो, हा विचार मनात आला आणि विमलाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. वेश्या व्यवसायाच्या दलदलीत फसलेल्या महिलांचे पुनर्वसन फार अवघड आहे. रेड लाइट एरियातील दलाल, असामाजिक तत्त्वे, गुंड त्यांना यातून बाहेर पडू देत नाहीत आणि बाहेर पडल्या तरी समाज तिला स्वीकारत नाही, अशा कात्रीत या महिलांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे या महिलांचे समुपदेशन करण्याचे अत्यंत अवघड काम राम इंगोलेंनी अंगावर घेतले. तुम्ही शिकल्या नाहीत, तुम्हाला समाजात प्रतिष्ठा नाही पण म्हणून तुमच्या मुलांनीही त्याच परिस्थितीत का वाढावे? हे समजावून सांगताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. शेकडो महिलांशी बोलल्यानंतर त्यापैकी फक्त पाच-सहा जणी मुलांना देण्यासाठी तयार झाल्या. परंतु, या मुलांचा बाप कोण? या प्रश्नाचे उत्तर कोणाही जवळ नव्हते. राम इंगोलेंनी त्यांना बेधडकपणे स्वत:चे नाव दिले. तुमच्या मुलांनी चांगले शिकल्यास, कर्तबगारी दाखविल्यास समाजही त्यांना शाबासकी देईल, हे या महिलांच्या मनावर बिंबवणे एवढे सोपे नसल्याची जाणीव रामभाऊंना झाली. तरीही हे काम पुढे नेण्यासाठीचे प्रयत्न त्यांनी सोडले नाहीत.साधारण १९८० नंतर सुरू झालेला हा प्रवास अत्यंत रोमांचक आहे.

गेल्या ३२-३३ वर्षांपासून सुरू असलेल्या मार्गक्रमणातील अनेक टप्प्यांवर असे असे प्रसंग उद्भवले की, एखाद्याने कामच सोडून दिले असते. राम इंगोलेंच्या नातेवाईकांना तो हे काम करतो म्हणून त्याच्याशी संबंध ठेवणे लाजिरवाणे वाटत होते. एक प्रकारचा सामाजिक आणि कौटुंबिक बहिष्कार सुरू झाला. यातही पहिल्या पाच-सहा मुलांना घेऊन त्यांनी भाडय़ाचे घर घेतले. नागपुरातील मानेवाडा परिसरात विमलाश्रम सुरू केला. पण, या मुला-मुलींची ओळख समाजापुढे आणायची नव्हती. कारण, समाज त्यांच्याशी कसा व्यवहार करील, याची काहीच शाश्वती नव्हती. या मुलांचे आयुष्य एखाद्या प्रसंगाने उद्ध्वस्त होऊ शकले असते. त्यामुळे जेवढी ओळख लपवता येईल तेवढे प्रयत्न राम इंगोलेंनी चालविले होते. पण, एक दिवस बिंग फुटलेच. परिणामी भाडय़ाची घरे मिळेनासी झाली. दीनवाणे चेहरे झालेल्या मुलांना घेऊन शेकडो वस्त्यांमध्ये घरासाठी अक्षरश: भीक मागण्याची वेळ आली. पहिल्याच टप्प्यात बसलेला दणका हादरवणारा होता. मुलांच्या राहण्याची सोय नाही, त्यांना खाऊ घालण्याचे वांधे, मुलींच्या अंगावरील फाटके कपडे अशी दयनीय स्थिती आली. यात काही मित्र धावून आले. अनेकांनी आर्थिक मदतीचा हात दिला, कुणी धान्याची सोय करून दिली, कुणी कपडे गोळा करून दिले. हे का घडले याचे कारण म्हणजे जे कोणी लोक या मुला-मुलींना भेटायला येत त्यांनी या मुलांवरचे संस्कार अचूक हेरले. घरी आलेल्या पाहुण्याला वाकून नमस्कार करणारी, त्याच्यासाठी चहा-पाण्याची व्यवस्था करणारी ही बालके कोणालाही आपलेसे करून घेणारीच होती. दिवस जात होते, तशी रामभाऊंकडील मुलांचीही संख्या वाढत होती. आपला मुलगा-मुलगी रामभाऊंकडे चांगल्या संस्कारात वाढत असल्याचे समाधान या मुलांच्या आयांना होते आणि त्याच आपल्या अन्य सहकारी महिलेला तिचे मूल रामभाऊंकडे पाठविण्याचा आग्रह धरीत होत्या.. हा एक नवीनच बदल घडून येत होता. वाइटातील वाईट अनुभव घेतल्यानंतरही समाज हा चांगल्या माणसांचाच आहे आणि यात देवमाणसे अधिक आहेत, हा अनुभव इंगोलेंसाठी नवा होता.

अचानक एक दिवस निवृत्त एअर व्हाइस मार्शल पी.के. देसाई यांच्या कुटुंबाला त्यांच्या कामाबद्दल कळले. या बडय़ा वायुदल अधिकाऱ्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळले. त्यांचे अमेरिकेत राहणारे बंधू नवीन देसाई यांनी मित्रांना सांगून पैसे गोळा केले. यातून मुलांच्या राहण्यासाठी कायम निवास असावा म्हणून नागपूरपासून १८ किमी अंतरावरील पाचगावला एक जागा दिली. झोपडी बांधून ही मुले राहू लागली. झाडाखाली शाळा भरू लागली. शाळेचे तोंडही न पाहिलेल्या याच मुलांनी आजूबाजूच्या खाण परिसरातील मजूर कुटुंबीयांच्या मुलांनाही शाळेची गोडी निर्माण केली. या मुलांची सामाजिक जाणीव प्रगल्भ होत असल्याचाच हा अनुभव होता. शाळा बांधणीच्या टप्प्यावर असतानाच दुर्दैवाने नवीन देसाईंचे अचानक अमेरिकेत निधन झाले. विमलाश्रमला

बसलेला हा मोठा धक्का होता. मात्र, दैव मदतीला धावले. नवीन देसाईंच्या मित्रांनी त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणखी पैसा गोळा करून पाठवला. याच पैशातून पाचगावातील पडीक जागेचे निवासी शाळेत रूपांतर झाले आहे. तब्बल २०० अनाथ मुले-मुली या शाळेत शिकत आहेत. आज कोणाचा विश्वास बसणे अवघड आहे, पण या मुलांची शैक्षणिक प्रगती उल्लेखनीय आहे. कमी-अधिक फरकाने ही मुले काही ना काही नवे शिकत आहेत. त्यांना सांभाळताना पक्षपात करता येत नाही. एकावरच प्रेम दाखविता येत नाही. प्रत्येक मुलाला आपला बाप रामभाऊ हाच आहे, एवढेच माहीत आहे. बाप आणि आईचे प्रेम त्यांना देण्यासाठी रामभाऊंचे आयुष्य आहे.

मुलांना शाळेत घालताना बापाचे नाव लावावे लागते. ते रामभाऊंनी दिल