#महापालिका विशेष : फुकट पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाला लावा

0
678

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – शहरातील नागरिकांच्या सुखसोईसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने विविध कामांसाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यांना नागरिकांनी दिलेल्या करातून भरघोष पगार दिले जातात. मात्र, महापालिकेतील अनेक कर्मचारी काडीचेही काम न करता, महापालिका त्यांना फुकट पोसत आहे. त्यांच्यावर प्रशासन व निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचेही नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. आयुक्तांनी अशा कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना कामाला लावले पाहिजे.

नागरिकांना योग्य सुविधा देण्यासाठी सुमारे १२ हजार कर्मचाऱ्यांची महापालिकेला आवश्यक्ता आहे. मात्र, सध्या महापालिकेकडे अवघे साडेसात हजार मनुष्यबळ आहे. त्यात मोठे पगार घेऊनही राजकीय आशीर्वाद व दादागिरीच्या जोरावर अनेक कर्मचारी काम टाळत असतील तर ही शहरातील नागरिकांची फसवणूक आहे. खासगी क्षेत्रात अशांना घरचा रास्ता दाखवला असता, मात्र सरकारी नोकरी आहे. आपले कोणीही काय करू शकत नाही. असा समज या कर्मचाऱ्यांचा आहे.

कर्मचाऱ्यांबाबत प्रशासन अनभिज्ञ

निवडणूक कामकाज किंवा इतर कामासाठी जिल्हाधिकारी, पीएमआरडीए किंवा मंत्रालयात गेलेले महापालिकेचे 43 कर्मचारी सहा महिने ते सहा वर्षापासून महापालिकेत परतले नाहीत. त्यांना पगार महापालिका देते. मात्र, ते दुसरीकडे चाकरी करतात. सध्या असे 43 कर्मचारी असल्याचे समोर आले असून हा आकडा वाढण्याची शक्यता प्रशासन विभागाने वर्तवली आहे. महापालिकेचे कोणते कर्मचारी कुठे काम करतात. याबाबत महापालिकेलाच माहिती नसणे, खूप शरमेची बाब आहे.

संघटना पदाधिकाऱ्यांना मिळतो पगार

महापालिका कर्मचाऱ्यांच्या संघटना व संस्थेचे पदाधिकारी हे महापालिकेचे कर्मचारी आहेत. त्यांना नागरिकांच्या करातून पगार दिला जातो. मात्र, असे अनेक पदाधिकारी मागील अनेक वर्षांपासून ते ज्या पदावर कामाला आहेत. ते कामच करत नाहीत. सतत संघटनेच्या कार्यालयात पडीक किंवा बाहेर फिरत असतात. तर राजकीय मंडळीच्या वशिल्याने महापालिकेत कामाला लागलेले कर्मचारी हजेरी लावून थेट घरी जातात. अशा कर्मचाऱ्यांना महापालिका फुकट पोसत आहेत. त्यांच्या विरोधात कोणताही वरिष्ठ अधिकारी कारवाई करू शकत नाही. या कर्मचाऱ्यांवर संबंधित शाखा प्रमुखांनी कारवाई करणे गरजेचे आहे. असे प्रशासन विभाग सांगून आपली जबाबदारी झटकत आहे.