अभिनेता मिलिंद दास्तानेचा ‘पीएनजी’ ला गंडा

0
840

पुणे, दि. १५ (पीसीबी) – औंध येथील ‘पीएनजी ब्रदर्स’मधून एका लोकप्रिय मराठी मालिकेतील अभिनेत्याने वेळोवेळी २५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटे घेऊन पैसे न देता फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात अभिनेता आणि त्याच्या पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत ‘पीएनजी ब्रदर्स’चे अक्षय श्रीकृष्ण गाडगीळ (वय ३४, रा. कर्वेनगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अभिनेता मिलिंद गणेश दास्ताने आणि त्यांची पत्नी सायली मिलिंद दास्ताने उर्फ सायली बाजाली पिसे (दोघेही राहणार त्रिमूर्ती हौसिंग सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘पीएनजी ब्रदर्स’चे औंधमधील आयटीआय रस्त्यावर सोने, चांदी दागिने विक्रीचे दुकान आहे. तेथे नीलेश दास्ताने व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. चार मार्च २०१८ला नीलेश यांनी तक्रारदारांना फोन करून दुकानात आपल्या ओळखीतील मिलिंद दास्ताने आणि त्यांची पत्नी सायली सोने खरेदीसाठी आले असून, त्यांनी त्यांच्याकडील तीन हजार ८८५ रुपयांचे जुने सोन्याचे दागिने देऊन दुकानातून चार लाख ९२ हजार रुपयांचे दागिने खरेदी केले आहेत. त्यांनी दोन चेक दिले आहेत, असे सांगितले. त्या वेळी मिलिंद यांनी आम्ही सांगू त्याचवेळी चेक बँकेत जमा करण्याचेही बजावले. त्यामुळे नीलेश यांनी चेक बँकेत भरले नाहीत. त्यानंतर मिलिंद दास्ताने पुन्हा ११ मार्च २०१८ला खरेदीसाठी दुकानात आले. त्या वेळी त्यांनी यापूर्वी दिलेले चेक परत घेऊन दुसऱ्या बँकेचे पुन्हा दोन चेक दिले. पैकी एक चेक वटला नाही.

तक्रारदारांनी याबाबत चौकशी करून मिलिंद दास्ताने कोण आहेत, याबाबत व्यवस्थापकाला विचारले. त्या वेळी मिलिंद दास्ताने मराठी मालिका आणि चित्रपटांत काम करणारे असल्याचे समजले. तसेच ते नीलेश यांच्या ओळखीचे असल्याचेही गाडगीळ यांना समजले. थकीत रक्कम येण्यास कोणतीही अडचण नसल्याचे नीलेश यांनी गाडगीळ यांना सांगितले. मात्र, मिलिंद यांनी पैसे वेळेवर न दिल्याने नीलेश यांनी त्यांना व्याज देण्याविषयी बजावले. त्यावर मिलिंद यांनी आपल्या आईची डोंबिवली येथे जागा असून, व्यवहार चालू आहे. हा व्यवबार झाल्यानंतर तीन कोटी ५२ लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे जेवढे सोने खरेदी करू, तेवढी रक्कम एकत्रित देऊ असेही सांगितले. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नी पुन्हा दुकानात आले. त्यांनी सोन्याचे दागिने, बिस्किटे, हिऱ्याची अंगठी, चांदीचे दागिने असे एकूण २५ लाख ६९ हजार रुपयांचे दागिने खरेदी केले. त्यानंतर त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून पैसे देण्याविषयी नीलेश यांनी विचारणा केली. मात्र, त्यांनी देण्यास असमर्थता दर्शवल्याने अखेर दास्ताने पती-पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.