‘कन्नड’च्या खानांमुळे औरंगाबादचा पराभव; शिवसेनेचा हर्षवर्धन जाधव, रावसाहेब दानवेंवर निशाणा

0
512

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाचे खापर  शिवसेनेने हर्षवर्धन जाधव आणि रावसाहेब दानवे यांच्यावर फोडले आहे. आजच्या (शनिवार) ‘सामना’तील अग्रलेखातून पराभवासाठी या दोघांना कारणीभूत ठरवून  त्यांच्यावर ताशेरे ओढले होते.

या अग्रलेखात जाधव आणि रावसाहेब दानवे यांना खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ यांची उपमा देण्यात आली आहे. ज्यांच्यामुळे औरंगाबादेत शिवसेनेचा पराभव झाला त्या ‘कन्नड’च्या खानासाठी औरंगजेबही कबरीतून अल्लाकडे दुवा मागत असेल. कन्नडच्या खानांसारखे खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ आमच्यातच निपजल्यावर धर्मांधांची विषवल्ली फोफावणारच.

औरंगाबाद महापालिकेत नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील विजयी खासदारांच्या अभिनंदनाचा ठराव येत असताना एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा स्वतंत्र अभिनंदन ठराव घ्यावा, हा हट्ट कशासाठी?, असा सवालही शिवसेनेने अग्रलेखातून उपस्थित केला आहे.

तसेच लोकसभेत शिवसेनेच्या झालेल्या निसटत्या पराभवामुळे औरंगाबादचा हिंदू नामर्द बनला नाही. ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्या सगळ्यासाठीच हा इशारा असल्याचे सांगत शिवसेनेने एमआयएमवर हल्लाबोल केला आहे.