अनधिकृत फ्लेक्स, विद्युत खांबांवरील किऑक्सवर तात्काळ कारवाई करा; आयुक्तांचे निर्देश

0
189

पिंपरी दि. १ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात अनधिकृतपणे लावण्यात येणाऱ्या बॅनर,फ्लेक्स, विद्युत खांबांवरील किऑक्सवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय अधिका-यांना दिले आहेत.

शहरात लावण्यात आलेले राजकीय फ्लेक्स काही व्यक्तींकडून फाडण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून त्यामुळे वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यासाठी अनधिकृत बॅनर,फ्लेक्स, विद्युत पोलवरील किऑक्स काढून टाकण्याबाबत पिंपरी पोलीस स्टेशन यांचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे. त्यास अनुसरुन महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित केला आहे.

महापालिका क्षेत्रामध्ये 1 ते 7 दिवसांकरिता ठराविक चौकामध्ये महापालिकेच्या जागेत अभिनंदन, वाढदिवस, सभारंभ, दहावा व इतर जाहिराती प्रसिद्धीसाठी तात्पुरत्या स्वरुपात ऑनलाईन परवाना दिला जातो. अ,ब,क,ड,इ,फ,ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये विनापरवाना लावण्यात आलेले बॅनर, फ्लेक्स तसेच विद्युत खांबांवरील किऑक्स त्वरित काढण्यात यावेत असे आदेशात नमूद करण्यात आले असून ते पुन्हा लागणार नाहीत याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश देखील क्षेत्रीय अधिका-यांना देण्यात आले आहेत.