अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षांना कॅबिनेट दर्जा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

0
518

ठाणे, दि. २५ (पीसीबी) – अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील तसेच उपाध्यक्ष संजय पवार यांच्या पदांना अनुक्रमे कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा दर्जा देत आहे, अशी घोषणा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) येथे केली.

अण्णासाहेब पाटील यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पणन मंत्री सुभाष देशमुख, आमदार व सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मराठा समाजातील तरुणांना शिक्षण, व्यवसाय, रोजगार यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी  केली जात आहे. मराठा तरुणांनी केवळ नोकऱ्या  न मागता नोकऱ्या देणारे बनावे. यासाठी  सरकार अनेक योजना कार्यान्वित करत आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर आम्ही त्याला अनुरूप कालबद्ध कार्यक्रम तयार करणार आहोत,’ अशी माहिती त्यांनी  यावेळी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘काही वर्षे निष्क्रिय असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ५०० कोटी रुपये देऊन आम्ही पुनरुज्जीवित केले आहे. या महामंडळाच्या माध्यमातून १० लाखांपर्यंत कर्ज उद्योग-व्यवसाय-स्वयंरोजगारासाठी आम्ही विनातारण देत आहोत. शासन अशा कर्जांसाठी तारण म्हणून हमी देत आहे. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेद्वारे गरीब आणि बहुजन समाजाच्या मुलांची उच्च शिक्षण घेण्यासाठी असलेली फी शासन देत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.