अजित पवार गटारी किडा, अशा व्यक्तीस आम्ही किंमत देत नाही – शिवसेना

0
976

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – अजित पवार यांची खोपडी रिकामी  आहे. ते एक गटारी किडा आहे. गटारातील घाण पाण्यावर तो श्वास घेतो. भ्रष्टाचाराच्याच प्राणवायूवर जगतो. अशा व्यक्तीस आम्ही किंमत देत नाही, अशा जहरी शब्दांत शिवसेनेने ‘सामना’ च्या अग्रलेखातून राष्ट्रवादीचे नेते  अजित पवार यांच्यावर शरसंधान साधले आहे. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत, अशी टीकाही या अग्रलेखात कऱण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन अजित पवार यांनी जालन्यातील सभेत टीका करताना ज्यांना पाच वर्षांमध्ये बापाचे स्मारक बांधता आले नाही ते राम मंदिर काय बांधणार ?, असा खोचक सवाल त्यांनी केला होता. यावर आजच्या (शनिवारी) सामनाच्या अग्रलेखातून अजित पवारांवर तोफ डागण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू आहे. या तंबूचा कळस म्हणजे अजित पवारांची रिकामी खोपडी आहे. अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही, हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या ‘मुतऱ्या’ थोबाडाने बोलत असतात, अशी टीका कऱण्यात आली आहे.

‘या महाशयांनी एकदा आमच्या फोटोग्राफीच्या छंदावर टीका केली. पण आम्ही आमचे छंद उघडपणे लोकांसमोर जोपासू शकतो. आम्ही आमच्या पंढरीची वारी, शिवरायांचे गडकोट किल्ल्यांच्या चित्रप्रदर्शनाचे जे छंद जोपासले आहेत ते उघडपणे करू शकतो. पण अजित पवार त्यांच्या छंदाचे प्रदर्शन उघडपणे करू शकतील का?. या गटारी किड्याचे नेमके काय छंद आहेत व त्या छंदांसाठी त्याने साताऱ्यात काय रेशमी उद्योग सुरू केले. त्याविषयीची  श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले अधिक माहिती देऊ शकतील, असे शिवसेनेने म्हटले आहे. अयोध्येतील राममंदिरावर व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर घसरला, म्हणून आम्ही त्यांची ही खेटराने पूजा केली आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे.