अरुण परेरा आणि गोन्साल्विस यांना पुणे न्यायालयात केले हजर

0
458

पुणे, दि. २७ (पीसीबी) – नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या अरूण परेरा आणि गोन्साल्विस यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पोलिसांकडून अटक करण्यात आलेले वेरगोन गोन्साल्विस, अड. सुधा भारद्वाज, अड. अरूण परेरा यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी शुक्रवारी फेटाळून लावला. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलांनी या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. मात्र, जामीन फेटाळल्यानंतर लगोलग पुणे पोलिसांच्या पथकाने गोन्साल्विस आणि परेरा यांना ताब्यात घेतले.

विशेष न्यायालयाने तिघांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी गोन्साल्विस, अड. परेरा यांना शुक्रवारी सायंकाळी अटक केली. भारद्वाज यांना दिल्लीत नजरकैद ठेवण्यात आले आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहेत. अटक केल्यानंतर त्यांना दुपारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

भारद्वाज, परेरा, गोन्साल्विस यांनी जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वला पवार यांनी तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. बचाव पक्षाच्या वकिलांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला. सरकार तसेच बचाव पक्षाकडून युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायालयाने शुक्रवारी तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून अटकेत असलेल्या पाच आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने पुणे पोलिसांना मुदतवाढ दिली होती. मुंबई उच्च न्यायालयाने मुदतवाढ बेकायदेशीर ठरवत ती रद्द केली. दरम्यान, महाधिवक्त्यांच्या विनंतीनुसार या आदेशाला १ नोव्हेंबपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयाच्या विरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.