अजित पवारांच्या स्वीय सहाय्यकाच्या भावाच्या हत्याप्रकरणी चौघांना अटक

0
462

सांगली, दि.१० (पीसीबी) – अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू आनंदराव पाटील हे २ फेब्रुवारीला सांगलीतील पलूस तालुक्यातील खटाव गावापासून काही अंतरावर ब्रह्मनाळ गावाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या त्यांच्या शेतामध्ये कामानिमित्त गेले होते. काम आटोपून दुपारी बारा वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आपल्या घराकडे परतत असताना, वाटेत दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात ते गंभीर झाले होते. हल्ल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले.  त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद पाटील आणि लक्ष्मण मडीवाल यांनी पुण्यातील दत्ता जाधव आणि अतुल जाधव यांना आनंदराव पाटलांना जीवे मारण्याची सुपारी दिली होती. जुन्या राजकीय आणि वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. त्यासाठी अरविंद पाटील आणि लक्ष्मण मडीवाल यांनी दत्ता जाधव आणि अतुल जाधव यांना १० लाख रुपयांची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले. याचप्रकणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यकाचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अरविंद पाटील, लक्ष्मण मडीवाल, दत्ता जाधव, अतुल जाधव असे या अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.