अखेर रेकॉर्ड ब्रेक; औरंगाबाद पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये यावर्षी जनतेने लावला अविश्वसनीय निकाल

0
360

औरंगाबाद, दि.१८ (पीसीबी) : गेली पंचवीस वर्ष पाटोदा ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता असलेले माजी सरपंच व पाटोदा गावच्या विकासाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भास्कर पेरे पाटील यांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा या आदर्श ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती आला आहे.

नव्या लोकांना संधी मिळावी म्हणून आपण निवडणूक लढवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. असे असले तरी त्यांची मुलगी अनुराधा पेरे पाटील ही निवडणुकीत उभी होती. परंतु तीन जागांसाठी मतदान झालेल्या निवडणुकीचा निकाल हाती आला तेव्हा अनुराधा पाटील या पराभूत झाल्याचा समोर आले आहे. त्यांच्याविरोधात असलेल्या उमेदवाराला २०८ मते मिळाली तर अनुराधा पेरे पाटील यांना १८३ मते मिळाली आहेत. गेल्या पंचवीस वर्षापासून पाटोदा गावाला केवळ राज्यातच नव्हे देशात नावलौकिक मिळवून देणाऱ्या भास्कर पेरे पाटील यांना ग्रामस्थांनी का नाकारले असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

अनुराधा पेरे यांचा पराभव धक्कादायक समजला जात असून पाटोदा ग्रामपंचायत निवडणूक होण्यामागे भास्कर पेरे पाटील यांच्या गटा बद्दल असलेली नाराजी होती हे आता स्पष्ट झाले आहे. अकरा सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये आठ सदस्य आधीच बिनविरोध निवडून आले होते. तीन जागांसाठी मतदान झाले, पैकी एका जागेवर भास्कर पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पाटील या उमेदवार होत्या. मात्र त्यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला.