क्रीडा संस्कृती खऱ्या अर्थाने रुजवायची असेल तर…

0
723

पुणे,दि.१८(पीसीबी) – क्रीडा मंत्र्याच्या कारकिर्दीत सर्वाधिक खेळ आणि खेळाडूंचा विचार करणारे मंत्री किरेन रिजीजू यांचा रविवारी पुण्यात पुन्हा एकदा खेळ आणि खेळाशी असलेला व्यासंग दिसून आला. खेळ ही आपली परंपरा आहे आणि खेळणारा खेळाडू ती परंपरा पुढे घेऊन जात असतो. त्यामुळे क्रीडा संस्कृती खऱ्या अर्थाने रुजवायची असेल, तर खेळाडूंचे भविष्य उज्ज्वल होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी येथे केले.

इंडिया खेलेगा या क्रीडा संस्थेच्या स्पोर्टस इन्किलाब योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन आज रिजीजू यांच्या हस्ते झाले. स. प. महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यात रिजीजू यांच्या भाषणातून पुन्हा एकदा खेळ आणि खेळाडूचे महत्व समोर आले. ते म्हणाले,’आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा भारतीय खेळाडू यश मिळवून देतो, तेव्हा त्याचे यश अवघा देश साजरा करत असतो. त्या वेळे तो कुठला याचा विचार होत नाही. म्हणजेच खेळाडू देशाला एका सूत्रात बांधत असतो. त्यामुळे खेळाडू हा जगलाच पाहिजे आणि त्याचा सैनिकासारखा सन्मान व्हायला हवा. समीवर लढताना सैनिक आपले सर्वस्व बहाल करत असतात. तसेच खेळाडू देशासाठी मैदानात आपले सर्वस्व पणाला लावत असतात. त्यांच्याही कामगिरीने देशाची मान उंचावत असते.’

सरकारने देशातील क्रीडा विषयक ध्येय धोरणांमध्ये अनेक बदल केले आहेत. प्रशिक्षणासाठी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक उपलब्ध करून दिले जात आहेत किंवा त्यासाठी त्यांना अर्थसहाय्य दिले जात आहे. पण, आम्हाला आता भारतीय प्रशिक्षकही निर्माण करायचे आहेत. एक वेळ अशी यावी की खेळाडूंनी परदेशी नव्हे तर भारतीय प्रशिक्षकांना प्राधान्य द्यायला हवे.
– किरेन रिजीजू, केंद्रिय क्रीडा मंत्री

सरकारने नेहमीच खेळाडूंची काळजी घेतली आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडो सरकार काळजीपूर्वक बघत असते, असे सांगून रिजीजू म्हणाले,’आतापर्यंत आपल्याकडे खेळाडूच्या आहाराविषयी फारसे लक्ष गांभीर्याने बघितले जात नव्हते. पण, या वेळी ही सरकारी चौकट मोडून मी खेळाडूंच्या आहारात तज्ज्ञांनुसार बदल करण्याचे आणि त्यांना परिपूर्ण आहार मिळावा असे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर केवळ खेळ हे खेळापुरते मर्यादित न राहता देशाच्या आर्थिक विकासात या क्षेत्राचा वाटा असायला हवा. क्रीडा क्षेत्रही उद्योग क्षेत्र ठरू शकते. त्यानुसार माझे आता काम चालू असून, देशातील व्यावसायिकांनी खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मला वाटते.’

क्रीडा प्रशिक्षणाद्वारे सक्षमीकरण या उद्देशाने कार्यरत असलेल्या पुण्यातील इंडिया खेलेगा या क्रीडा संस्थेच्या स्पोर्टस् इन्किलाब प्रोजेक्टच्या दुसर्‍या टप्प्याचे उद्घाटन (दि. 17 जानेवारी 2021) केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते झाले. राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेती टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने टाकलेला चेंडू रिजिजू यांनी उपस्थितांमध्ये टोलवून दुसर्‍या टप्प्याचे उद्घाटन केले. इंडिया खेलेगा या संस्थेला गती मिळून ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू या संस्थेतून निर्माण व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

इंडिया खेलेगा ही क्रीडा प्रशिक्षण संस्था 2017 पासून स्पोर्टस् इन्किलाब योजने अंतर्गत वंचित बालकांना विनामूल्य टेबल टेनिस प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबवत आहे. सासवड जवळील सार्थक सेवा संघाच्या पुनर्वसन केंद्रातील मुले या उपक्रमात सहभागी झाली आहेत. या उपक्रमाच्या दुसर्‍या टप्प्यात पुण्यातील जनसेवा फाउंडेशनचे वंचित बालकांसाठीचे केंद्र, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागातील लोकबिरादरी प्रकल्प, ईशान्य भारतातून महाराष्ट्रात आलेल्या मुलांसाठी काम करणार्‍या पूर्वांचल विकास आणि ईश्वरपूरम वसतीगृह व इतर संस्थांमधील मुले नुकतीच सामील झाली आहेत. क्रीडा प्रशिक्षणाद्वारे सक्षमीकरण हा उपक्रमामागील उद्देश आहे. संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करताना रिजीजू यांनी अशा संस्था आणि संघटक तयार झाले, तर देशात क्रीडा संस्कृती नक्कीच निर्माण होईल, असा विश्वासही व्यक्त केला. श्रुती परांजपे, सन्मय परांजपे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.