केंद्रिय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय

0
486

नवी दिल्ली,दि.१८(पीसीबी) – भारतीय खेळ प्राधिकरणाच्या (साई) नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व सुविधांना प्रसिद्ध खेळाडूंची नावे देऊन त्यांच्या आठवणी जतन करण्याचा वेगळाच निर्णय केंद्रिय क्रीडा मंत्रालयाने रविवारी घेतला. क्रीडा क्षेत्रात देशाचा नावलौकिक उंचावणाऱ्या या हिरोंचा सन्मान करण्याचा आमचा एक प्रयत्न असेल, असे ‘साई’ने प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात लखनौ येथे उभारण्यात आलेल्या वातानुकुलित कुस्ती हॉल आणि शिकणाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या तरण तलाव, भोपाळ येथीर १०० बेडचे हॉस्टेल, सोनीपत येथीर बहुउपयोगी हॉल आणि मुलींचे हॉस्टेल, गुवाहटी येथील नवे साई प्रशिक्षण केंद्र यांचा समावेश असून, या सर्व केंद्रांना तेथील स्थानिक खेळाडूंची नावे देण्यात येणार आहेत. या निर्णयाविषयी बोलताना क्रीडा मंत्री किरेन रिजीजू म्हणाले,’देशात क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी हे पहिले पाऊल उचलले आहे. देशाचा गौरव उंचावणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करणे हा त्यांचा हक्क आहे. त्यांची ओळख अशी सातत्याने समोर आल्यास युवा पिढी खेळामध्ये कारकिर्द घडविण्यासाठी प्रेरित होईल.’

या निर्णया अंतर्गत निधन झालेल्या कुठल्याही खेळाडूचे नाव दिले जाणार नाही. रिजीजू म्हणाले,’केंद्र सरकार आजी आणि माजी खेळाडूंच्या सदैव पाठिशी खंबीरपणे उभे आहे. त्यांचे जीवन सुलभ आणि सुकर व्हावे यासाठी सर्व सुविधा त्यांना देण्यात आल्या आहेत. या योजनेत फक्त आणि फक्त हयात खेळाडूंचा गौरव केला जाणार आहे. सरकार खेळाडूंच्या पाठिशी आहे हाच संदेश आम्हाला यातून द्यायचा आहे.’

दरम्यान देशातील फारच कमी क्रीडा सुविधांना आणि क्रीडा केंद्रांना खेळाडूंची नावे दिली गिली आहेत. खेळाडूंच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी केवळ नाव देणे हे पुरेसे आहे का याविषयी नुसतीच चर्चा होत राहिली आहे. मात्र, या नव्या निर्णयाने हा पायंडा बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत.