अखेर द्रमुकमधील नेतृत्वाचा वाद शमला; एम.के.स्टॅलिन पक्षाचे नवे अध्यक्ष

0
749

चेन्नई, दि. २८ (पीसीबी) – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर त्याचा राजकीय वारसा कोण सांभाळणार यावरून द्रमुकमध्ये (द्रविड मुनेत्र कळघम) उफाळलेला वाद अखेर शमला आहे. चेन्नईमध्ये आज (मंगळवार) झालेल्या पक्षाच्या महापरिषदेत द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांची पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.  

करुणानिधी यांचे ज्येष्ठ पुत्र एम. अलगिरी यांनी स्टॅलिन यांच्या राजकीय नेतृत्वाला आव्हान देत पक्षात बंड पुकारले होते. त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र,  करुणानिधी यांच्या निधनानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांनी  पुन्हा  हालचाली सुरू केल्या होत्या. त्यामुळे द्रमुकमध्ये फूट पडण्याची शक्यता व्यक्त केला जात होती.

दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर  रविवारी स्टॅलिन यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आणि अपेक्षेप्रमाणे आज अध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. स्टॅलिन यांच्या निवडीवर अलागिरी यांच्या गटाकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली   नाही.