अखेर ‘त्या’ बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

0
242

वाकड,दि.२५(पीसीबी) – बेकायदेशीरपणे फ्लॅटचा ताबा घेतला. तसेच बांधकाम व्यावसायीकासोबत जागेचा विकसन करारनामा व कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र केलेले असताना तीच जागा बक्षीसपत्राने दुसऱ्याच्या नावावर करून बांधकाम व्यावसायिकाचे फसवणूक केली. याबाबत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विलास गोपाल डोंगरे, वंदना विलास डोंगरे, अमेय विलास डोंगरे, पल्लवी सुयोग डोंगरे, सुयोग विलास डोंगरे (सर्व रा. डोंबिवली पूर्व, ठाणे. सध्या रा. नावकर बिल्डकॉन, ज्ञानदा कॉलनी, ताथवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अतुल पोपटलाल धोका (वय 54, रा. चिंचवड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास डोंगरे यांनी त्यांची ज्ञानदा कॉलनी ताथवडे येथील 3.90 आर जमीन फिर्यादी अतुल यांच्या नवकार बिल्डकॉन कंपनीसोबत विकसन करारनामा व कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र, पुरवणी करारनामा करून दिले होते. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यातील तीन फ्लॅट डोंगरे यांना देण्याचे ठरले होते.

इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर डोंगरे यांनी त्यांच्या फ्लॅटची सत्यनारायण पूजा करायची असल्याचे सांगून फ्लॅटचा ताबा घेतला. कायदेशीर ताबा दिलेला नसताना डोंगरे यांनी फ्लॅटवर ताबा घेऊन फिर्यादी यांच्या परस्पर ते फ्लॅटमध्ये राहण्यास आले.

इमारतीच्या अन्य तीन फ्लॅटच्या नावावरील इलेक्ट्रिक मीटरबाबत महावितरणकडे खोटे अर्ज करून ते स्वतःच्या नावावर करून घेतले. विलास डोंगरे यांनी पार्किंग आणि टेरेसवर अनाधीकृपणे लोखंडी ग्रील लाऊन अन्य रहिवाशांच्या जाण्या-येण्यास अडथळा निर्माण केला.

विलास डोंगरे यांनी त्याच जमिनीचे वेगवेगळ्या तारखेला अन्य आरोपींच्या नावाने बक्षिसपत्र तयार केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.