अखेर तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर

0
573

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – हिवाळी अधिवेशन सध्या सुरु  असून तिहेरी तलाक विधेयक  लोकसभेत आज (गुरूवार) सादर करण्यात आले. या विधेयकांवर २५० खासदारांनी मतदान केले. त्यानंतर हे विधेयक २३८ विरुद्ध १२ मतांनी मंजूर करण्यात आले.  मतदानाआधीच काँग्रेसने सभात्याग करत आपला या विधेयकाला विरोध दर्शवला होता. मतदानाआधी झालेल्या चर्चेदरम्यान विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. तिहेरी तलाक बेकायदा ठरवणारे नवे विधेयक केंद्र सरकारने सोमवारी लोकसभेत सादर केले होते.  

या विधेयकावर चर्चा करताना  हे विधेयक कोणत्याही समाज किंवा धर्माविरोधात नसल्याचे कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत स्पष्ट केले.  हे विधेयक महिलांचे अधिकार आणि त्यांच्या न्यायासाठी आहे, असे ते म्हणाले. तर एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी हे आमच्या संस्कृती आणि मान्यतेचे उल्लंघन आहे, असा विधेयकावर विरोधी सूर लावला.

या  विधेयकावर सखोल अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मत काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जून खरगे यांनी व्यक्त करून हे विधेयक संविधानाशी संबंधित आहे. त्यामुळे ते  संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले पाहिजे, असे खरगे म्हणाले. या विधेयकाचा  परिणाम ३० कोटी महिलांवर होणार आहे. त्यांचे रक्षणही महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी देखील खरगे यांच्या सुरात सूर मिळवला.

कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी बाजू मांडताना म्हणाले की,  ‘तिहेरी तलाक विधेयक कोणत्याही धर्म किंवा समाजाविरोधात नसून महिलांना सन्मान देण्याबाबत आहे. विरोधी पक्षांच्या शिफारशींची दखल घेऊन  या विधेयकात अनेक फेरफार करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. यापूर्वीही बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात कठोर शिक्षेच्या तरतुदीसंदर्भात संसदेचे एकमत झाले होते. आपण महिलांच्या अधिकारावर भाष्य करतो, मग आता यावरही आपले एकमत झाले पाहिजे, असे ते म्हणाले.