“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”

0
293

 – भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांची प्रतिक्रिया

नाशिक, दि. २५ (पीसीबी) – महाराष्ट्र सरकारने कोरोनामुळे दुसऱ्यांदा मंदिरे /धार्मिक स्थळे बंद केले होते, पहिल्या वेळी मंदिर बंद केल्यामुळे भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीने आंदोलनांची राळ उठवली होती त्यानंतर मंदिरे उघडण्यात आली. परंतु दि. ४ एप्रिल २०२१ पासून महाराष्ट्रात पुन्हा मंदिरे ,धार्मिकस्थळे बंद करण्यात आलीत . त्यामुळे ज्यांची उपजीविका धार्मिक स्थळांवर अवलंबून आहे अशा लाखो छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत होते. म्हणुनच भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीद्वारे मंदिरे उघडण्यासाठी पुन्हा आंदोलने सुरू करण्यात आली. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर, वेरुळ येथे भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी साधु-संतासह रुद्राभिषेक करून आंदोलन केले होते. त्यानंतर शेवटच्या श्रावण सोमवारी दि.३० ऑगस्ट रोजी राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्याची घोषणा केल्याने भाजप आध्यात्मिक आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी नाशिकच्या रामकुंडावर गोदामाईची आरती करुन साधु-महंतांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. यावेळी महंत भक्तिचरणदास महाराज, महंत अनिकेत शास्त्री, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतिश शुक्ल आदि. उपस्थित होते.

यावेळी बोलताना आचार्य तुषार भोसले म्हणाले, “आमच्या आवाहनानंतर राज्यभरातल्या भाविक जनतेने रस्त्यावर उतरत शंखनाद आंदोलन केले. आमचा हा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी तर घुमलाच पण त्यांच्या पितरांपर्यंत जाऊन पोहोचला आणि पितृपक्ष असल्याने हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खडसावून सांगितले, की महाराष्ट्रात सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या नादाला लागून देवी-देवतांना बंदिस्त करुन ठेवण्याचा जो अधर्म सुरु आहे तो बंद करा आणि तातडीने मंदिरे उघडा. म्हणुनच ठाकरे सरकारला उशीरा सुचलेलं हे शहाणपण आहे. अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या आमच्या संघर्षाला अखेर यश आलं”.