“मोशी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” : माजी महापौर राहुल जाधव

0
200

– महापालिका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांना मागणी

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – मोशी परिसरात मोकाट फिरणार्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिकेच्या संबंधीत यंत्रणेला अपयश आले आहे. कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाचा त्रास मोशी परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. तर अनेकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी माजी महापौर तथा नगरसेवक राहुल जाधव यांनी केली आहे.

याबाबत महापालिका पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी डॉ. अरुण दगडे यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मोशी, बो-हाडेवाडी, जाधववाडी रस्ता, शिवरस्ता, आल्हाट वाडी, शिवाजी वाडी, सेकटर चार, सहा येथे व स्पाईन रस्ता परिसरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. स्पाईन रस्त्यावर भरधाव येणारया वाहनाच्या आडवी मोकाट कुत्री आल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रात्रीच्या वेळी हा त्रास अधिकच सहन करावा लागत आहे. प्राधिकरण सर्कल भागात कुत्र्यांचा उपद्रव अधिक आहे. परिसरात शाळा व महाविद्यालये असल्याने विदयार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेत जावे लागत आहे.

या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. नागरिकांना होणार्या त्रासातून मुक्त करावे. तशा सुचना संबंधीत अधिकाऱ्यांना तात्काळ द्याव्यात, असेही माजी महापौर राहुल जाधव यांनी म्हटले आहे.