अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस पाठिंबा देणार ?   

0
633

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडी करण्यास काँग्रेस आग्रही आहे. मात्र, आंबेडकरांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.   तरीही राज्यातील आंबेडकरवादी समाजाची मते वळविण्यासाठी काँग्रेस अकोल्यामध्ये त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता  सूत्रांकडून व्यक्त केली जात  आहे.  आंबेडकरांना पाठिंबा देऊन राज्यातील त्यांची मते आपल्या पारड्यात पाडून घेण्याची काँग्रेसची रणनिती असू शकते, असे बोलले जात आहे.    

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधातील महाआघाडीत प्रकाश आंबेडकर यांना सहभागी करून   घेण्यास काँग्रेस आग्रही आहे. मात्र,  प्रकाश आंबेडकर यांनी आधीच एमआयएमशी युती केली आहे. एमआयएमची साथ सोडून काँग्रेससोबत जाण्यास प्रकाश आंबेडकर यांनी नकार दिला आहे. तर एमआयएमला सोबत घेण्यास काँग्रेस तयार नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना अकोला मतदारसंघात पाठिंबा देऊन राज्यातील आंबेडकरवादी मते काँग्रेसकडे वळवण्याची योजना काँग्रेसची आहे.

प्रकाश आंबेडकरांना आघाडीत सामील करुन घेण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र त्यांनी एमआयएमबरोबर हातमिळवणी केल्यामुळे काँग्रेसची  कोंडी झाली आहे. त्यामुळे  आघाडी न करता काँग्रेस अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.