अंकुशराव लांडगे हत्येतील आणखी एका गुन्हेगारावर भोसरीत हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

0
1387

भोसरी, दि. ३ (पीसीबी) – भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांची हत्या करणाऱ्या सराइत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. त्याच्यावर सोमवारी (दि. २) रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी भोसरीतील धावडेवस्ती येथे हल्ला केला होता. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी (दि. ३) पहाटे त्याचा मृत्यू झाला.

जितेंद्र ऊर्फ जितू रामचंद्र पुजारी (वय ३२, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांच्या खून प्रकरणात गोट्या धावडे हा प्रमुख आरोपी होता. जितू पुजारी हा गोट्या धावडे गँगमधील होता. लांडगे यांच्या खूनप्रकरणात गोट्या धावडेसह जितू पुजारी यालाही अटक करण्यात आली होती. तसेच जितू याने बलात्काराचाही गुन्हा केला होता. या प्रकरणात त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली होती.

दरम्यान, गोट्या धावडे हा काही वर्षे कारावास भोगून बाहेर आला होता. त्याचा भोसरीतच खून झाला. गोट्या धावडेच्या खुनानंतर काही महिन्यांतच जितू पुजारी हा देखील कारागृहातून सुटला होता. त्याच्यावर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास भोसरीतील धावडेवस्तीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी (दि. ३) पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. भोसरी पोलिस तपास करत आहेत.