गणेशोत्सव, नवरात्र, दसऱा घरगुती होणार ? कोरोना आख्यान भाग २ – अविनाश चिलेकर

0
531

कोरोना आख्यान भाग २ 
गणेशोत्सव, नवरात्र, दसऱा घरगुती होणार ? 

कोरोना साथीने आपल्या रुढी, प्रथा, परंपरा, संस्कृतीवरही घाला घातला आहे. खरे तर, काळाच्या आघात जे काही बिघडलेले ते दुरुस्त करण्याची ही सुवर्ण संधी आहे. आपला समाज, संस्कृती सण, समारंभ, सोहळे प्रिय आहे. पुढच्या दोन महिन्यांपासून सणांची मालिका सुरू होईल. नागपंचमी पासून थेट दिवाळीपर्यंत आठ-दहा दिवसाला एक सण असतोच. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी हे त्यातल्या त्यात मोठे सण. पुणे पिंपरी चिंचवड शहरात किमान पाच हजारावर सार्वजनिक गणेश मंडळे, नवरात्रोत्सव साजरे करतात. उत्सव कसा साजरा करायचा यावर आतापासून मंथन सुरू केले पाहिजे. दोन व्यक्तींमध्ये किमान पाच फुटाचे अंतर ठेवण्याचे बंधन दोन वर्षे पाळावे लागणार आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन कसे करणार ते महत्वाचे असेल. आज चीन मध्ये कोरोना पुन्हा पलटतो की काय अशी भिती आहे. तीच शक्यता आपल्यालाही गृहीत धरून काम करावे लागणार. सर्वर्तोपरी खबरदारी घ्यावी लागेल. घाबरायचे कारण नाही, थोडी दक्षता घ्यावी लागेल बस्स.

गणेश मंडळांची देखावा स्पर्धा असते. कोणत्या देखाव्यासाठी अधिक गर्दी होते तो सरस, असे एक समिकरण असते. मंडळांनाही गर्दीशिवाय शोभा नसते आणि कार्यकर्त्यांनाही जोश येत नाही. देखावे पहायला होणारी गर्दी आता या वर्षी तरी अशक्यच दिसते. प्रथमच असे घडते आहे. दहा दिवसांच्या उत्सवात देखावा स्पर्धा असतात त्या रद्द कराव्या लागतील. विसर्जन मिरवणुकांसाठी खचाखच भरलेले रस्ते, गलका आता चालणार नाही. विविध संस्थांचे स्वागत मंडप, तेथील मान्यवरांची गर्दी हे सगळे तुर्तास विसरा. मंडळापुढील सामुहिक आरती, मान्यवर पाहुण्यांचे आगत स्वागत, सत्कार सोहळे यालाही लगाम घालावा लागणार. या घडामोडींत मंडप, स्पीकरवाले, डेकोरेशनवाले, मूर्तीकार, सजावट साहित्य विकणारे, फुलवाले यांचे धंदे काही प्रमाणात मार खाणार. घरोघरी थाटमाटात गौरायांचे आगमन होते, हळदिकुंकवासाठी मोहल्ला जमतो. हे समारंभ कसे करणार हा प्रश्नच आहे. जीवंत देखावे साजर करणाऱ्या कलाकारांच्या उत्साहावर पाणी फेरणार. हे संकट निवारण करण्याची प्रार्थना बाप्पांकडे करण्याशिवाय आपण काही करू शकत नाही. नवरात्रसुध्दा असेच सुनेसुने असेल. दसऱ्याचे सोने लुटण्याची चौका चौकातील परंपरा तसेच रावण दहनाचे भव्य दिव्य कार्यक्रम त्यासाठी होणारी गर्दी आता आवरती घेणे हिताचे राहिल.

शहरातील सर्व मंदिरे, मशिदी, चर्च, गुरूद्वार बंद आहेत आणि पुढचे दोन महिने ती खुली होतील की नाही याबाबत साशंकता आहे. म्हणजे एकूणच धार्मिक कार्यक्रमसुध्दा बंद असतील. दर चतुर्थीला पुणे शहरात दगडुशेठ, सारसबाग गणपती तसेच चिंचवडगावात मोरया गोसावी समाधी दर्शनासाठी किमान दहा-वीस हजाराची यात्रा भरते. आजवर प्रथमच गेल्या महिन्यात चतुर्थीला दर्शन बंद राहिले. दोन्ही शहरात स्वामी समर्थ मंदिरांतून जयंती सोहळा साजरा होत असतो. दर्शनासाठी हजारो भविक जमत असतात. कोरोनामुळे यावेळी जन्मोत्सव आणि नंतर आलेली पुण्यतिथीसुध्दा मंदिरा पुरतीच मर्यादित झाली. शहरात दीड लाखावर जैन बांधव आणि किमान ३० वर जैन स्थानके आहेत. कोरोना संकटामुळे तमाम जैन बांधवांनी भगवान महाविर जयंतीची मिरवणूक व सोहळा रद्द केला आणि घरगुती स्वरुपात जयंती केली. यावेळी रावेतला श्रीकृष्ण मंदिरातील जन्सोत्सव सोहळा होईल का नाही, ते सांगता येत नाही. घटनेचे शिल्पकार भारतरत्न डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याला दर वर्षी लाखो भिमसैनिक स्मारकाजवळ जमा होतात. मोठी गर्दी, मिरवणुका, उत्साह असतो. यावेळी प्रथमच १४ एप्रिलला स्मारक परिसर सुनासुना होता. आता देशाचा स्वातंत्र दिनसुध्दा घरातच करावा लागेल. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मशिदित जाऊन सामुहिक नमाज पठण करत असतात. शहरात दोन लाख मुस्लिम बांधव आहेत. त्यांनी घरातूनच नमाज पठण करावे, असे आवाहन मुल्ला मैलविंसह विविध नेतेमंडळींनी केले आणि सर्वजण ते पाळतात. शहरातील सर्व मशिदीत शांतता आहे. डिसेंबर मध्ये चर्चमध्ये होणारा प्रभू येशूचा स्मरण सोहळासुध्दा शक्य होईल का याबाबत शंका वाटते. शहरात किमान २५ वर चर्च आहेत. ख्रिश्चन बांधवांनी नुकताच इस्टर संडे घरात साजरा केला. आता डिसेंबरमध्ये ख्रिस्मस सुध्दा घरगुती करावा लागेल असे दिसते.