आमचं ही ठरलं धडा कसा शिकवायचा

0
272

कसबा हा गाडगीळांचा, कसबा हा बापटांचा, कसबा टिळकांचा, का काढला आमच्याकडून कसबा, आम्ही दाबणार NOTA

पुणे, दि. ११ (पीसीबी) : माघारीची मुदत संपल्यानंतर पुणे कसबा पेठ व पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, भाजप उमेदवार अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत आता होणार आहे. त्यानंतर राहुल कलाटे यांच्यासंदर्भात बॅनर लावण्यात आले होते. आता कसबा पेठेत टिळक परिवाराला उमेदवारी दिली नाही, यावरुन बॅनर लागले आहे. कसबा पेठ मतदार संघातून भाजपने हेमंत रासने यांची उमेदवारी जाहीर केली आणि भाजपच्या या बालेकिल्ल्यात आता पुन्हा पोस्टर झळकला आहे.

कसबा पेठ येथे भाजपचे हेमंत रासने, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. पुणे कसबा पेठ मतदार संघातून टिळक परिवाराला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली नाही. यामुळे पुण्यातील मोदी गणपतीजवळ अज्ञातांकडून बॅनर लावण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की,

आमचं ही ठरलं धडा कसा शिकवायचा
कसबा हा गाडगीळांचा
कसबा हा बापटांचा
कसबा टिळकांचा
का काढला आमच्याकडून कसबा
आम्ही दाबणार NOTA

यापुर्वी लावले होते बॅनर
कसबा पेठ मतदार संघातून भाजपने हेमंत रासने यांची उमेदवारी जाहीर केली. यामुळे ब्राम्हण समाज संतप्त झाला आहे. यापुर्वी कसबा पेठेत बॅनर लावले होते. कुलकर्णीचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार?

सकाळी पिंपरी चिंचवडमध्ये बॅनर
पिंपरी चिंचवडमध्ये फ्लेक्सच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे बंडखोर राहुल कलाटे यांच्यांवर निशाणा साधण्यात आलाय. ही बंडखोरी खोके घेऊन झाल्याचं त्यात म्हटलंय आहे. यातून त्यांची गुलामी अन गद्दारी समोर आल्याचं म्हटले आहे.

एका अपक्षाची उमेदवारी खोक्यातून…
नागपूरची गुलामी,
ठाण्याची गद्दारी,
एकदेव ओके डोक्यातून…
खरा शिवसैनिक असे या बॅनरमध्ये म्हटले आहे.