लोणावळ्यातील विकासासाठी राज्य शासनाकडून अधिकचा निधी आणणार – श्रीरंग बारणे

0
196

लोणावळा, दि.३० (पीसीबी) :- राज्यातील महत्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळ्यातील वाहतूक, पार्किंगची समस्या सोडविली जाईल. पार्किंगच्या व्यवस्थेसाठी रेल्वे विभागाची जागा मिळविण्याकरिता प्रयत्न सुरु आहेत. नगरपरिषदेचे राज्य शासनाकडे असलेले प्रलंबित प्रस्ताव तत्काळ पाठवावेत. शिंदे-फडणवीस सरकार त्याला तत्काळ मंजुरी देईल. प्रलंबित असलेले कामे मार्गी लावली जातील. नगरपरिषदेला शासनाकडून अधिकचा निधी आणला जाईल, अशी ग्वाही असे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

लोणावळा नगरपरिषदेच्या प्रलंबित कामाची आढावा बैठक खासदार बारणे यांनी बुधवारी घेतली होती. राज्य व केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेली कामे व प्रस्थावित कामाबाबत माहिती घेऊन सूचना दिल्या. राज्य शासनाच्या मान्यतेसाठीचे प्रस्ताव तत्काळ पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

या आढावा बैठकीस माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडीत पाटील, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेश खांडभोर, भाजपा तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, आरपीआएचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, प्रशांत ढोरे यांच्यासह राष्ट्रीय राजमार्ग (एनएचफोर), वनविभागाचे अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या कामांची माहिती घेतली. त्याबाबतचे प्रस्ताव तत्काळ पाठविण्याच्या सूचना केल्या. लोणावळ्यातील भाजी मंडई विकसित करण्यासाठी बीओटी (बांधा, वापरा व हस्तांतरीत करा) ठराव केला आहे. तो राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. लोणावळ्यात पार्किंगची मोठी समस्या आहे. पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी रेल्वेची जागा मिळावी अशी नगरपरिषदेची मागणी आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.

रेल्वेच्या दोन उड्डाणपुलाची कामे चालू आहेत. एका पुलाचे काम प्रलंबित आहे. त्यासंदर्भात पाठपुरावा सुरु आहे. लोणावळा हे पर्यटनस्थळ आहे. लोणावळा स्टेशनचे विस्तारीकरण करुन दर्जेदार, सर्व सोयी-सुविधायुक्त स्टेशन बनविण्याची मागणी नुकतीच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची विनंती त्यांच्याकडे केली आहे.

लोणावळ्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. वाहतूककोंडी, पार्किंगची समस्या सोडविली जाईल. राज्य सरकारकडे प्रलंबित असलेले कामे मार्गी लावणे, लोणावळा नगरपरिषदेला शासनाकडून अधिकचा निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लोणावळ्याच्या विकासाच्या दृष्टीने बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. प्रत्येक महिन्याला विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल. लोणावळ्यातील विकासाला गती दिली जाईल. लोणावळ्याच्या विकासासाठी शिंदे-फडणवीस सरकार निधी कमी पडून देणार नाही, असेही खासदार बारणे म्हणाले