भाजपचा जोरदार धक्का! ऊर्जामंत्री बावनकुळेंचेही तिकीट कापले!

0
782

नागपूर, दि. ४ (पीसीबी) – राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने जोरदार धक्का दिला आहे. कामठी विधानसभा मतदारसंघातून बावनकुळे यांचा पत्ता कापण्यात आला असून त्यांच्याऐवजी टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बावनकुळे यांच्या पत्नीला उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, ती निरर्थक ठरली आहे.

पहिल्या यादीपासूनच धक्कातंत्राचा अवलंब करत भाजपने पक्षातील मोठ्या नेत्यांना घरी बसवण्याचा धडाका लावला आहे. त्यात एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांचा समावेश होता. त्यात आता बावनकुळेंचाही नंबर लागला आहे. बावनकुळे यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांना उमेदवारी मिळेल, असे बोलले जात होते. बावनकुळे यांनी आज सकाळी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. मात्र, त्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्याचं दिसत आहे. त्यांच्या ऐवजी भाजपने टेकचंद सावरकर यांना उमेदवारी दिली आहे. सावरकर यांच्यानंतर पक्षाच्या फॉर्मवर अनिल निधान यांचे नाव आहे. बावनकुळे या भाजपच्या उमेदवार नसतील, हे भाजपने स्पष्ट केले आहे.

तिकीट मिळणार नसल्याचे सप्ष्ट झाल्याने ज्योती बावनकुळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारासाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरणार आहे.