संशयास्पद व्यवहारांची माहिती पाठवा; चिंचवड मधील बँकांना पत्र

0
428

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये 10 लाख रुपयांपेक्षा अधिक रोकड जमा करणे किंवा काढण्याच्या व्यवहारांची, संशयास्पद वाटणाऱ्या 1 लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या व्यवहारांची माहिती बँकांना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे दररोज पाठवावी लागणार आहे. याबाबत चिंचवड मतदारसंघातील सर्व बँकांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील यांनी ही माहिती दिली. चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. आदर्श आचारसंहिता सुरु असून भंग होऊ नये यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने विविध पथके तयार करण्यात आली आहेत. निवडणुकीसंबंधी कोणत्याही आर्थिक गैरव्यवहारांची बाब निदर्शनास आल्यास त्यावर कारवाई केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांची माहिती चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्व बँकांना पाठविण्यात आली आहे.

चिंचवड मधील संशयास्पद वाटणाऱ्या व्यवहारांची दैनंदिन माहिती [email protected] या इमेल आयडीवर पाठविण्याबाबतचे लेखी पत्र सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील यांनी सर्व बँकांना पाठविले आहे.