आघाडीत बिघाडी : राष्ट्रवादीला काँग्रेसचा पाठींबा आहे, असे जनतेने समजू नये – सचिन साठे 

0
539

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात आघाडीची पुरती वाताहत झाली असून भोसरी व चिंचवडमध्ये पक्षाला उमेदवार देता आला नाही. त्यात आघाडीत काँग्रेसला गृहीत धरू नये, असा इशाराच काँगेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिला आहे.

“कोणताही उमेदवार पुरस्कृत करण्याअगोदर काँग्रेसला विचारात घेणे गरजेचे आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते याबाबत कोणतीच कल्पना देत नाहीत. यापुढेही हीच भुमिका असेल, तर राष्ट्रवादीला काँग्रेसचा पाठींबा आहे, असे जनतेने समजू नये.” असे आवाहनच साठे यांनी मतदारांना केले आहे. पिंपरीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी माजी महापौर कविचंद भाट यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित होते.

साठे म्हणाले की, “पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदार संघ राष्ट्रवादीने आपल्याकडे घेतले. मात्र, तिन्ही मतदार संघात उमेदवारांचा कोणताच ताळमेळ नाही. आघाडीच्या वतीने निश्चित केलेल्या कोणत्या उमेदवाराचा प्रचार करायचा हे, मित्र पक्षांना सांगणे गरजे आहे. मात्र, याबाबत राष्ट्रवादीच्या वतीने काँग्रेसच्या वरिष्ठ व शहरातील पदाधिकाऱ्यांना सांगितले जात नाही.”

तसेच राष्ट्रवादीने मित्र पक्षांना मिठीत घेण्याचा प्रयत्न करायला हवा, मुठीत नाही. सर्वधर्म समभाव या भावनेचा शहरात मोठा मतदार वर्ग काँग्रेसच्या विचारांना मानतो. त्यामुळे भोसरी व चिंचवडमध्ये उमेदवार पुरस्कृत करताना, त्याची पार्श्वभूमी पाहणे गरजेचे असून धर्म निरपेक्षच उमेदवार पुरस्कृत करावा. असे साठे यावेळी म्हणाले.