पीसीबीचा अंदाज ठरला खरा ! मावळतून सुनिल शेळके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी

0
890

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – भाजपच्या पहिल्या १२५ उमेदवारांच्या यादीत मावळ मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केली नव्हती. त्यामुळे राज्यमंत्री बाळा भेगडे यांना डावलून सुनिल शेळके यांना उमेदवारी मिळते, की काय?, अशी शंका अनेकांचा मनात होती. मात्र, भाजप बाळा भेगडे यांनाच उमेदवारी देईल आणि सुनिल शेळके राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. असे वृत्त एक महिन्यापुर्वी पीसीबीने प्रसिद्ध केले होते. त्यामुळे पीसीबीचा अंदाज आज खरा ठरला आहे.

सुनिल शेळके हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यांची पाचवी पिढी भाजपबरोबर काम करते. मागील वेळी त्यांना पक्षाने थांबण्यास सांगून बाळा भेगडे यांनी दुसऱ्यांदा संधी दिली. मात्र, यावेळी तरी पक्ष त्यांनी संधी देईल, अशी आशा त्यांना होती. त्यामुळे शेळके यांनी मावळ मतदार संघ पिंजून काढला. मतदारसंघात त्यांना प्रतिसाद पाहता, शेळके यांनाच भाजप संधी देते की काय अशी शंका निर्माण झाली होती. त्यात पहिल्या यादीत मावळचे नाव नसल्याने बाळा भेगडे व सुनिल शेळके यांची उत्सुकता वाढली होती. मात्र, दोन वेळा आमदार व राज्यमंत्री पद मिळाल्याने भेगडे यांचे पक्षात व मतदार संघात चांगले वजन निर्माण झाले आहे. त्या जोरावर भेगडे यांना भाजपने तिसऱ्यांदा संधी दिली.

दरम्यान, भेगडे यांना उमेदवारी मिळताच सुनिल शेळके यांना रातोरात राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली. शेळके यांनी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपची आशा सोडली नाव्हती. मात्र, भाजपने शेळके यांना डावल्याने त्यांनी तात्काळ राष्ट्रवादीशी जवळीक साधली. शेळके यांच्या रूपाने राष्ट्रवादीला तगडा उमेदवार मिळाला असून मावळची लढाई रंगतदार होणार असल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. परंतू, मुळ राष्ट्रवादीच्या इच्छुकांची मनधरणी करण्यासाठी शेळके व राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोठे कौशल्य वापरावे लागेल.

काही तासात भाजपचे रूपांतर राष्ट्रवादीत

भाजपने उमेदवारी नाकारताच काही तासांत राष्ट्रवादी शेळके यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर त्यांच्या प्रत्येक सोशल मिडीया बॅनरवर असलेले भाजपचे नेते व चिन्ह काही तासात राष्ट्रवादीत रूपांतरीत झाले आहेत.