‘मला पुन्हा नक्षलवादी होण्यास भाग पाडू नका’; गडकरी संतापले

0
677

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – ‘मी आधी नक्षलवादी होतो नंतर मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये गेलो. मला पुन्हा नक्षली व्हायला भाग पाडू नका.,’ असा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या समोरच रस्ते बांधणीच्या कामांमध्ये अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांना गडकरी यांनी खडे बोल सुनावले आहेत. दिल्ली येथील गडकरींच्या कार्यालयामध्ये केरळमधील कामांचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीमध्ये गडकरींनी हे वक्तव्य केले.

वेगवेगळ्या विकासकामांच्या फाइल अडवून ठेऊ नका असे आदेशही गडकरींनी सरकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ‘मला ठाऊक आहे अडचणी निर्माण करणार कोण आहेत. इथे मी बॉस आहे हे लक्षात घ्या. राज्यातील रस्त्यांच्या कामासाठी विजयन यांनी मला भेटण्याची ही पाचवी वेळ आहे. हे लज्जास्पद आहे,’ असे मत गडकरींनी अधिकाऱ्यांशी बोलताना व्यक्त केले. आपल्या या इशाऱ्यामध्ये गडकरींनी सरकारी अधिकाऱ्यांना रस्ते बांधणीसाठी जमीन अधिग्रहण करायला अल्टीमेट दिला आहे. वेळेत कामं झाली नाही तर गाठ माझ्याशी आहे असेही गडकरींनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते.

केरळ सरकारने राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग बांधण्यासाठी २५ टक्के खर्च उचलण्याची तयारी दाखवल्यानंतर केंद्राने अनेक प्रकल्पांना मंगळवार तातडीने मंजुरी दिली आहे.