आता लेखापरीक्षणातील आक्षेपांच्या पूर्ततेसाठी दर महिन्याला आढावा

0
179

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लेखापरिक्षण विभागामार्फत विविध विभागांचे लेखापरीक्षणाचे कामकाज सुरू आहे. या लेखापरिक्षणामध्ये मोठ्या संख्येने आक्षेप प्रलंबित आहेत. लेखापरीक्षणामध्ये प्रलंबित असलेल्या आक्षेपाची संख्या मोठी असल्याने आक्षेपांची पूर्तता करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या पातळीवर दर महिन्याला आढावा बैठक घेण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत.

महापालिकेत मिळकत कर वसुली विभाग, स्थापत्य विभाग, बांधकाम परवानगी, वैद्यकीय विभाग, भांडार हे महत्वाचे विभाग आहेत. तर महापालिकेच्या प्रत्येक विभागांच्या फायलीचे लेखापरिक्षण विभागामार्फत आक्षेप काढून त्रुटी दुरू करण्याचे कामकाज असते. त्यानुसार 2005 ते 2015 या कालावधीतील प्रलंबित आक्षेप काढून यामधील त्रुटी दूर करण्याचे कामकाज पालिकेच्या लेखा परिक्षण विभागामार्फत सुरू आहे. या दहा वर्षांतील सर्व विभागांच्या फायलींमधील त्रुटी दुर करण्यासाठी आयुक्त सिंह यांनी मार्च 2023 चे उदिष्ट निश्‍चित करून दिले आहे.

2005 ते 2015 या कालावधीत जे आक्षेप असतील त्याची माहिती लेखापरिक्षण विभागाला सादर करण्याची सूचना आयुक्त सिंह यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिली आहे. या दहा वर्षांतील लेखापरीक्षणातील प्रलंबित आक्षेपांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने नियमितपणे याचा पाठपुरावा होणे आवश्‍यक आहे. यासाठी आयुक्तांनी एक कार्यपध्दती निश्‍चित केली आहे. लेखापरिक्षणातील प्रलंबित आक्षेपांसाठी मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले यांनी बैठकांचे आयोजन व समन्वयक म्हणून कामकाज करावे, आक्षेपांची सविस्तर माहिती सादर करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच लवकरात-लवकर लेखापरिक्षण व्हावे, यासाठी अतिरिक्त आयुक्त यांच्या पातळीवर दर महिन्यामध्ये बैठकीचे आयोजन करावे. त्रैमासिक अहवाल माझ्याकडे सादर करावा, असेही आयुक्त सिंह यांनी आदेशात म्हटले आहे.