खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त शरीरसौष्ठव स्पर्धा; ‘महाराष्ट्र श्री 2023’चा सौरभ हिरवे मानकरी

0
217

पिंपरी, दि. 20 (पीसीबी) – शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेत पुण्यातील सौरभ हिरवे याने ‘महाराष्ट्र श्री 2023’चा किताब पटकाविला. 85 किलो वजन गटामध्ये त्याने पहिला क्रमांक पटकाविला.

काळेवाडी विजयनगर येथील बालाजी लॉन्समध्ये ही स्पर्धा पार पडली. शिवसेनेचे विधीमंडळातील प्रतोद, आमदार भरत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र श्री 2023’चा मानकरी सौरभ हिरवे याला सन्मानचिन्ह देण्यात आले. बेस्ट पोझसाठी अमरावतीच्या सुवेश जादिया तर बेस्ट इम्प्रुव्हमध्ये पुण्यातील सचिन सावंत यांना गौरविण्यात आले. बक्षीसाची रोख रक्कम देण्यात आली. तर, प्रत्येक गटातील 1 ते 5 क्रमांच्या शरीरसौष्ठवपटूला प्रशस्तीपत्रक, ट्रॉफी व रोख बक्षीस देण्यात आले. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, युवा सेनेचे शहरप्रमुख विश्वजित बारणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर उपस्थित होते.

सुनिल पाथरमल यांनी राज्यस्तरीय भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा वजन गट 55, 60, 65, 70, 75, 80 आणि 80 किलोच्या पुढील अशा सात गटात ही स्पर्धा झाली. 80 किलो वजनी गटात पुण्यातील पवन थोरात, 75 किलो औरंगाबादचा विशाल मेहत्रे, 70 किलोत अकोल्याचा सुवेश जैदा, 65 किलो वजनी गटात पुण्यातील सचिन सांवत, 60 किलो वजनी गटात मुंबईतील उदय धुमाळ आणि 55 किलो वजनी गटात पुण्यातील अजय ओझरकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. विविध प्रकारांमध्ये झालेल्या या स्पर्धेत 110 शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”या स्पर्धेत राज्यभरातून मोठ्या संख्येने शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते. गेल्या 1४ वर्षांपासून शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले जाते. तरुणांमध्ये पिळदार शरीर करण्याची ‘क्रेझ’ आहे. शहरात जीमची संख्या वाढत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शरीरसौष्ठवपटूला प्रोत्साहन मिळाले. शरीरसौष्ठवपटूंनी पिळदार शरीराचे सादरीकरण केले”.