पिंपरी चिंचवडमध्ये ईडीची छापेमारी, ४०० कोटींचा घोटाळा

0
395

पिंपरी, दि.२७ (पीसीबी) : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पुणे जिल्ह्यात छापेमारी सुरु केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे. पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे छापेमारी करण्यात आली आहे. त्यांच्यांशी संबंधित काही ठिकाणांवर ईडीचे पथक कारवाई करत आहे.

सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जांचे १२४ बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. या प्रकरणात जवळपास ४३० कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केले. ज्या व्यक्तींची कर्ज मिळण्याची पात्रता नव्हती, त्यांना कर्ज दिले गेले. कर्ज देताना परतफेडीची क्षमता व अन्य निकष तपासले नाही.

यामुळे बँकेचे मोठे नुकसान झाले. सहकार सहआयुक्त राजेश जाधवर यांनी २०२० मध्ये या कर्जांविषयीचे ऑडिट केले होते. त्यानंतर हे घोटाळा उघडकीस आले. या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी अमर मूलचंद यांच्यासह पाच जणांना अटक केली होती.

नुकतेच आले होते जामिनावर बाहेर

अटकेत असलेले अमर मूलचंदानी काही महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आले. त्यानंतर आज ईडीने छापा टाकला. बँकेवर आरबीआयने प्रशासक नेमला आहे. या बँकेत हजारो ठेविदारांचा कोट्यवधींचा पैसा अडकून आहे.