कसब्याची चिंता करू नका. मी इथे बसलोय…

0
198

पुणे, दि. १२ (पीसीबी) : कसबापेठ विधानसभा पोटनिवडणूक चुरशी होणार असल्याचं चित्रं आहे. या निवडणुकीत भाजप, महाविकास आघाडी आणि हिंदू महासभेचा उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार आहे. मनसेने अजूनही कुणालाच पाठिंबा दिलेला नाही. तर दुसरीकडे भाजपमध्ये मानापमान नाट्य रंगल्याने भाजपची डोकेदुखी वाढलेली आहे. मात्र, असं असतानाच भाजपसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल भाजपचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. यावेळी कसब्याची चिंता करू नका. मी इथे बसलोय, असं आश्वासनच गिरीश बापट यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. त्यामुळे कसब्याच्या निवडणुकीत बापट स्वत: लक्ष घालणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल घोले रोड परिसरातील महात्मा फुले कला दालनात खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. गिरीश बापट गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यानिमित्ताने शिंदे यांनी बापट यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना काळजी घेण्याचा सल्लाही दिला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास खलबतं झाली. जुन्या आठवणींना उजाळा देतानाच यावेळी राजकीय परिस्थिती आणि कसब्याच्या निवडणुकीवरही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

लवकर बरे होतील, कामाला लागतील

या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. गिरीश बापटांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. त्यांची तब्येत बरी नाही. आम्ही जुने मित्र आहोत. सदिच्छा भेटीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते लवकर बरे होतील आणि कामाला लागतील असा विश्वास आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

कसब्याच्या निवडणूकिबद्दल त्यांनी स्वतःच मला सांगितले. कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतील, मी सांगायच्या आधीच त्यांनीच मला सांगितले. कसब्याची चिंता करू नका. मी इकडे बसलो आहे. आपलं नेटवर्क आहे. कामाला लागलो आहे, असं बापट यांनी सांगितल्याचं शिंदे म्हणाले.
या दोन्ही जागा गेल्या अनेक वर्षे भाजपकडेच आहेत. लोकांचा भाजपच्या आमदारांवर विश्वास आहे. या मतदारसंघात भाजपने कामे केली आहेत. सरकारने कामं केली आहेत. या निवडणुकीत दोन्ही जागेवर भाजपचे उमेदवार निवडून येणार आहेत, असा दावाही शिंदे यांनी केला