माजी महापौराच्या घरातील नऊ जण कोरोना बाधित

0
497

पुणे, दि. 5 (पीसीबी): पुण्याच्या माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यमान नगरसेविका वैशाली बनकर यांच्या कुटुंबातील नऊ जणांचा कोरोना अहवाल आज (5 जुलै) सायंकाळी पॉझिटिव्ह आला आहे. या नऊ जणांवर येवलेवाडी येथील महापालिकेच्या कोरोना केअर सेंटरमध्ये (सीसीसी) उपचार करण्यात येत आहेत. 

दरम्यान, नगरसेविका वैशाली बनकर आणि माजी नगरसेवक सुनील बनकर यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. सुनील बनकर यांची आई, चुलते व त्यांचा नातू, भाऊ, भावजय, चुलत भाऊ, चुलत भावजय, चुलत भाऊ व त्यांची नऊ वर्षांची मुलगी या 9 जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आली आहे. 

नगरसेविका वैशाली बनकर व सुनील बनकर हे दोघेही नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी रोज प्रभागात फिरत असतात. प्रभागात अनेक नागरिकांना त्यांनी आर्सेनिक-30 ह्या होमिओपॅथिक औषधांचे वाटप केले आहे. तसेच, नागरिकांची आरोग्य तपासणी शिबिरे देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात आयोजित केली होती. 

वैशाली बनकर व माजी नगरसेवक सुनील बनकर राहत असलेल्या सातववाडी, गोंधळे नगर भागात कोरोनांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. विविध प्रश्न सोडविण्यासाठी नागरिक त्यांच्या घरी व कार्यालयात रोज येत असतात. तसेच, या भागातील नागरिकांच्या अंत्यविधीसाठी घरातील लोक जात असतात. त्यामुळेच कुटुंबातील व्यक्तींना कोरोना झाला असावा, असा अंदाज बनकर यांनी व्यक्त केला.