५०० दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत – लष्कर प्रमुख

0
398

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय झाला आहे. काही महिन्यांपूर्वी इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांनी हवाई हल्ला करुन हा तळ उद्धवस्त केला होता. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी सोमवारी ही माहिती दिली. इंडियन एअर फोर्सच्या एअर स्ट्राइकमध्ये बालकोटच्या दहशतवादी तळाचे नुकसान झाले होते हे यावरुन स्पष्ट होते.

आता पाकिस्तानने पुन्हा त्या ठिकाणी लोकांची जमवाजमव सुरु केली आहे असे जनरल रावत म्हणाले. कालच एका वर्तमानपत्राने बालकोटमधील दहशतवादी तळ सुरु झाल्याचे वृत्त दिले होते. त्यानंतर लष्करप्रमुखांनी हे विधान केले आहे.

“५०० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. भारतात दहशतवादी घुसवण्यासाठी पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. या शस्त्रसंधी उल्लंघनाचा कसा सामना करायचे ते आम्हाला ठाऊक आहे. कुठल्या जागेवरुन कशी कारवाई करायची ते आमच्या जवानांना ठाऊक आहे. आम्ही पूर्णपणे अलर्ट असून त्यांचे घुसखोरीचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत याची खबरदारी घेऊ” असे बिपीन रावत म्हणाले.

चेन्नईत अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. घुसखोरीचे डाव उधळून लावण्यासाठी आणखी एक स्ट्राइक करण्याची लष्कराची योजना आहे का ? या प्रश्नावर रावत यांनी आम्ही पुन्हा तशीच कारवाई का करु? त्याच्यापुढे का जाऊ नये? आम्ही काय करु शकतो यावर त्यांनाच विचार करु दे असे उत्तर दिले.