मुंबईत नोकरीचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार

0
479

मुंबई, दि.२३ (पीसीबी) – नोकरीसाठी मुलाखतीला बोलावून  एमबीए  झालेल्या एका २८ वर्षीय युवतीवर जुहू येथील हॉटेलमध्ये  बलात्कार  केल्याच्या आरोपाखाली जुहू पोलिसांनी दिल्लीच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याने पीडित युवतीला एका खासगी बँकेत एचआरची नोकरी देण्याचे आमिष दाखवल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

साहिलसिंग अरोरा असे  या आरोपीचे नाव  आहे.

पीडित युवतीने दिलेल्या माहितीनुसार, ही युवती उत्तर प्रदेशातील असून एका खासगी कंपनीत नोकरी मिळाल्यानंतर ती गेल्या वर्षीच मुंबईत आली. तेव्हा पासून ती नवी मुंबईत राहत होती. काही महिन्यानंतर तिने नोकरी सोडली आणि ती उत्तर प्रदेशात परतली. त्यानंतर नोकरीच्या शोधात ही तरुणी एप्रिल महिन्यात पुन्हा मुंबईत आली. त्यानंतर जुलैमध्ये तिला आरोपी अरोराचा नोकरीसाठी फोन आला. आरोपी आरोराने तिला आपला दुसरा मोबाइल क्रमांक देत एका खासगी बँकेत एचआरची नोकरी उपलब्ध असल्याचे सांगितले. आपण या खासगी बँकेत टॉप मॅनेजमेंट टीममध्ये असल्याचेही त्याने तिला सांगितले. पीडितेला महिन्याला ३० हजार रुपये पगार मिळेल असे आश्वासनही त्याने तिला दिले. त्यानंतर अरोराने तिला १९ सप्टेंबरला फोन करून सर्व कागदपत्रांसह मुलाखतीसाठी जुहूमधील एका हॉटेलात येण्यास सांगितले. ही युवती हॉटेलच्या रुममध्ये पोहोचताच आरोपीने रुमचा दरवाजा लॉक केला आणि तिच्यावर बलात्कार केला. याला विरोध करत तरुणीने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मात्र आरडाओरड केल्यास याचे गंभीर परिणाम होतील अशी धमकी देत त्याने तिला गप्प केले. आरोपीने थेट दुसऱ्या दिवशी तरुणीला हॉटेलच्या रुममधून बाहेर जाण्याची परवानगी दिली. मात्र याबाबत पोलिसात तक्रार केल्यास परिणाम वाईट होईल असे धमकावले. तक्रार केल्यास युवतीसोबतचा अश्लील व्हिडिओ तुझ्या वडिलांना पाठवू, अशी धमकीही त्याने तिला दिली. मात्र, न घाबरता या युवतीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.  आरोपीली अटक केली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.