…म्हणून राज्याच्या सत्तेत सहभागी झालो – उध्दव ठाकरे

0
614

मुंबई,  दि. २४ (पीसीबी) – सध्या भाजप वाटेल त्या पद्धतीने राज्ये जिंकत आहे. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसला फोडून सत्ता स्थापन केली जात आहेत. जर आम्ही महाराष्ट्रात सत्तेत सहभागी झालो नसतो, तर काँग्रेस, राष्ट्रवादी फोडून त्यांनी सत्ता स्थापन केली असती. आणि आम्ही पुन्हा रस्त्यावर बोंबलत राहिलो असतो.  आमच्या नेत्यांना कारभाराचा अनुभव घेता यावा, म्हणून आम्ही राज्याच्या सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

दैनिक ‘सामना’च्या दुसऱ्या भागाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा  मोदी सरकारवर हल्ला चढवला. पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्ये ५ हजार शेतकऱ्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. हेच तुमचे विकासाचे मॉडेल  का ? असा सवाल करून ‘२०१४ चा जनमताचा कौल ही जनतेची चूक नव्हती, तर जनतेची फसवणूक होती,’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ‘राजकारणात पैशांचा वापर वाढला आहे. हा पैसा कोठून येतोय हे समजले, तर इतर राजकीय पक्षांनाही फायदा होईल,’ असा चिमटाही त्यांनी काढला.

मनसेचे नगरसेवक फोडल्याच्या प्रश्नावर  उद्धव यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.  ‘माझी पार्टी शिवसेनाप्रमुखांनी दुसऱ्याचा पक्ष फोडून स्थापन केलेली नाही. ती शिवसेना म्हणूनच स्थापन झाली आणि शिवसेना म्हणूनच आहे आणि ती शिवसेना म्हणूनच राहील. तिने तिचे कधीही नाव, नेता किंवा निशाण बदलले नाही आणि दुसरा पक्ष फोडून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन नाही केला, असा टोला उध्दव ठाकरे यांनी लगावला.