अभिनेत्री जया प्रदा भाजपमध्ये; निवडणुकीत सपाच्या आजम खान यांना देणार टक्कर

0
698

लखनौ, दि. २५ (पीसीबी) – अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या जया प्रदा यांनी सोमवारी (दि. २५) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांना भाजपकडून उत्तर प्रदेशच्या रामपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे. याच मतदारसंघातून समाजवादी पक्षाने आजम खान यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे जया प्रदा विरुद्ध आजम खान अशी लढत रंगण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

जया प्रदा समाजवादी पक्षाच्या नेत्या होत्या. परंतु, २०१० मध्ये त्यांना पक्षातून बाहेर पडावे लागले. समाजवादी पक्षाचे आणखी एक माजी नेते अमर सिंह यांच्याशी त्यांनी हातमिळवणी केली होती. तसेच २०१२ मध्ये राष्ट्रीय लोक मंच पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. परंतु, या पक्षाला विधानसभेत एकही जागा मिळाली नाही. जया प्रदा अमर सिंह यांना राजकारणात आपले गॉडफॉदर मानतात.

गेल्या अनेक दिवसांपासून अमर सिंह भाजपचे समर्थन करताना दिसून येत आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या चौकीदार कॅम्पेनशी सुद्धा जोडले गेले. त्यांनी ट्विटरवर नुकतेच आपले नाव चौकीदार अमर सिंह असे केले आहे.