हिंजवडीत सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या १२ जणांविरोधात गुन्हा

0
505

हिंजवडी, दि. १४ (पीसीबी) – तहसीलदारांच्या आदेशानुसार जागेचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना विरोध करणाऱ्या १२ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे.

याप्रकरणी मंडल अधिकारी हेमंत लक्ष्मण नाईकवाडी (वय ५२, रा. क्षितीज सोसायटी, बिबवेवाडी, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सविता पठारे आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन महिला, सुषमा उमेश माळी यांची नातेवाईक अनोळखी महिला, लक्ष्मण नामदेव पवार यांची नातेवाईक वयोवृद्ध महिला आणि इतर तीनजणी, विनोद आत्माराम भोसले, सविता वसंत आहेर, व्यंकटेश्‍वर रेड्डी या बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नाईकवाडी हे मंडल अधिकारी आहेत. सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ते तहसीलदारांच्या आदेशानुसार हिंजवडी येथील सर्व्हे नं. २६२/३, आनंतानगर, किर्ती क्लासिक येथील मिळकतींचा ताबा घेण्यासाठी ते त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत गेले असता आरोपींनी त्यांना विरोध करत सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी वरील बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक आंगज तपास करत आहेत.