भाजप मध्यप्रदेशात सरकार स्थापनेसाठी दावा करणार नाही- शिवराज सिंह चौहान

0
681

भोपाळ, दि. १२ (पीसीबी) – मध्यप्रदेशातील पराभव स्विकारत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मध्यप्रदेशातील जनतेचा कौल मान्य असल्याने भाजप सरकार स्थापनेसाठी दावा करणार नाही, असेही चौहान यांनी स्पष्ट केल्याने मध्यप्रदेशात सरकार स्थापन करण्याचा काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला आहे.

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला १५ वर्षानंतर सत्ता गमावावी लागली आहे. राज्यात मतदारांनी भाजपला नाकारल्याने शिवराज सिंह चौहान यांनी अखेर राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. पत्रकार परिषद घेऊन चौहान यांनी ही घोषणा केली. मी राजीनामा देत असून राज्यपालांकडे राजीनामा सोपवण्यासाठी जात आहे. आम्ही राज्यात सरकार स्थापन करणार नाही, असे चौहान यांनी स्पष्ट केले.

मध्यप्रदेशात भाजपला १०९ जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे अपक्षांना गळाला लावून भाजप मध्यप्रदेशात सत्ता स्थापन करेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र चौहान यांच्या घोषणेने ही चर्चा साफ फोल ठरली आहे.