मसाप पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षपदी राजन लाखे यांची बिनविरोध फेरनिवड!
महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष राजन लाखे यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अध्यक्षांसह १५ सदस्यीय संपूर्ण पंचवार्षिक कार्यकारिणीचीही बिनविरोध निवड झाली.
चिंचवडगाव येथील काशीधाम मंगल कार्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत डॉ. पुरुषोत्तम काळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभेला १६४ सभासदांची उपस्थिती लाभली. आगामी शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नूतन कार्यकारिणी पिंपरी-चिंचवड शाखेचा नावलौकिक आणखी वाढवेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

