पिंपरी, दि. १२ – भाजप आमदार महेश लांडगे यांचे वर्चस्व असलेल्या भोसरी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू कऱण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई करण्यात येत असून, विविध भागांतील रेड झोन व पूररेषेने बाधित बांधकामांवर निष्कासनाची कार्यवाही करण्यात आली आहे.
१ एप्रिल २०२६ रोजी प्रभाग क्र. ३ मौजे भोसरी (चक्रपाणी वसाहत) व प्रभाग क्र. ४ दिघी येथील रेड झोनमधील एकूण ४ अनधिकृत आर.सी.सी. बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या बांधकामांचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ४,५०० चौ.फूट आहे. तसेच, १० एप्रिल २०२६ रोजी मोशी येथील इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेतील तसेच मोशी टोलनाका परिसर व दक्षिण लक्ष्मीनगर येथील नाल्यालगत असलेल्या एकूण ११ अनधिकृत पत्राशेड व आर.सी.सी. बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे १४ हजार ६५१ चौ.फूट क्षेत्रफळावरील बांधकामे हटविण्यात आली.
याशिवाय, ११ एप्रिल २०२६ रोजी प्रभाग क्र. ३ भोसरी (चक्रपाणी वसाहत) व प्रभाग क्र. ४ दिघी येथील आणखी ०५ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून, त्याचे एकूण क्षेत्रफळ ६ हजार १५० चौ.फूट आहे.
क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे व कार्यकारी अभियंता सूर्यकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग तसेच ‘इ’ क्षेत्रीय धडक कारवाई पथक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.
उपअभियंता विनायक माने, कनिष्ठ अभियंता संदीप वैद्य, क्षितिजा देशमुख यांच्या अधिपत्याखाली अतिक्रमण धडक पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. कारवाईदरम्यान कार्यालय अधीक्षक संजय घुले, अतिक्रमण निरीक्षक प्रविण लांडे, बीट निरीक्षक सचिन पाटील, आदिनाथ नागरे, दत्तात्रय छडीदार, शिवानी भगत, भाग्यश्री वंजारे तसेच एम.एस.एफ. जवान, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.











































