पिंपरी चिंचवड मधील छत्रपती संभाजीनगर व शाहूनगरमधील ‘जी ब्लॉक’च्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

bpcauthor
3 Min Read

आमदार अमित गोरखे यांच्या २०२४ पासूनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश; मंत्री उदय सामंत व एमआयडीसी संचालक मंडळाची धोरणात्मक मान्यता

पिंपरी, दि. ३
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर व शाहूनगर परिसरातील ‘जी ब्लॉक’ हा भूखंड औद्योगिक कर्मचाऱ्यांसाठी निवासी क्षेत्र म्हणून विकसित करण्यात आलेला असून, या परिसरातील जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यासाठी आमदार अमित गोरखे यांनी सन २०२४ पासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.

सन २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात, दि. १९ डिसेंबर २०२४ रोजी नागपूर येथे झालेल्या विधानपरिषद अधिवेशनात आमदार अमित गोरखे महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला होता.

छत्रपती संभाजीनगर व शाहूनगर परिसरातील एमआयडीसीच्या निवासी भूखंडावरील जुन्या इमारतींची अवस्था, रहिवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन या इमारतींच्या पुनर्विकासासाठी ठोस धोरण आखण्याची मागणी त्यांनी केली होती.
या मागणीच्या अनुषंगाने आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) संचालक मंडळाने दि. १५ मे २०२६ रोजी झालेल्या बैठकीत ठराव क्र. ७२०४ अन्वये निवासी भूखंडावरील धोकादायक तसेच जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भातील धोरणास मान्यता दिली आहे.

या निर्णयामुळे CDCPR-23 मधील विनियम ६.४ नुसार धोकादायक तसेच ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा मार्ग खुला झाला आहे. तसेच ३० वर्षांखालील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या वेळी सदनिकांच्या संख्येत वाढ करण्याची आवश्यकता असल्यास, नियमानुसार आकारणी करून पुनर्विकास करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

याशिवाय, माहिती तंत्रज्ञान उद्योगासाठी असलेल्या तरतुदीच्या धर्तीवर निवासी भूखंडांच्या पुनर्विकासासाठी सह-विकासक (Co-Developer) नियुक्त करण्यासही एमआयडीसी संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पुनर्विकास प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
२०२४ पासूनचा सातत्यपूर्ण पाठपुरावा अखेर यशस्वी आमदार अमित गोरखे यांनी याबाबत बोलताना सांगितले की,
“छत्रपती संभाजीनगर आणि शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीचा हा विषय होता. जुन्या व धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसोबतच त्यांना चांगल्या व आधुनिक निवासाची सुविधा मिळणे आवश्यक आहे.

त्यामुळे सन २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न विधानपरिषदेत मांडला. त्यानंतरही शासन आणि एमआयडीसी स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. आता एमआयडीसी संचालक मंडळाने पुनर्विकास धोरणाला मान्यता दिल्याने या भागातील नागरिकांच्या अपेक्षांना मोठा दिलासा मिळाला आहे.”

ते पुढे म्हणाले, “या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या इमारतींचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. लवकरात लवकर आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू व्हावी, यासाठीही आपला पाठपुरावा सुरू राहील.”

दरम्यान, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आमदार अमित गोरखे यांना पाठविलेल्या पत्राद्वारे एमआयडीसी संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली असून, धोकादायक व जुन्या निवासी इमारतींच्या पुनर्विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या धोरणाच्या अंमलबजावणीची कार्यवाही एमआयडीसीमार्फत तातडीने करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.

या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर, शाहूनगर आणि संबंधित ‘जी ब्लॉक’ परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, २०२४ पासून आमदार अमित गोरखे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर ठोस धोरणात्मक यश मिळाले आहे.

या कामासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व सुनेत्राताई पवार यांचे विशेष आभार माननीय अमित गोरखे यांनी मानले आहेत…

“नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि हक्काच्या घरांच्या पुनर्विकासासाठी पाठपुरावा सुरूच राहणार!” – आमदार अमित गोरखे

Share This Article