सभागृहाची प्रतिष्ठा, शिस्त आणि नियमबद्ध कामकाजावर भर; सदस्यांना आवश्यक सूचना
पिंपरी, दि. १: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी महापालिका सभेच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व सन्माननीय नगरसदस्यांची सत्तारूढ पक्षनेते यांच्या दालनामध्ये महत्त्वपूर्ण पूर्वबैठक पार पडली. या बैठकीत महापालिका सभेतील कामकाज, सभागृहाची प्रतिष्ठा, सदस्यांमधील समन्वय, विषयांवरील चर्चा आणि सभागृहातील शिस्त याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महापालिका सभेचे कामकाज अधिक शिस्तबद्ध, नियमबद्ध आणि लोकहिताच्या विषयांवर केंद्रित राहावे, या दृष्टीने सर्व सदस्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
सभागृहात प्रत्येक सदस्याने सभागृहाची प्रतिष्ठा व सन्मान कायम राखावा. कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी सदस्यांनी हात वर करून महापौर यांची परवानगी घ्यावी व बोलण्याची संधी मिळाल्यानंतरच आपले मत मांडावे. एकाच वेळी अनेक सदस्यांनी बोलणे, जागेवरून विनापरवानगी बोलणे, इतर सदस्यांच्या भाषणात अडथळा आणणे अथवा सभेच्या कामकाजात व्यत्यय निर्माण करणे टाळावे. चर्चेदरम्यान संबंधित विषयापुरतेच बोलावे आणि विषयाशी संबंध नसलेले अथवा अनावश्यक अवांतर वक्तव्य टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या.
महापालिका सभेतील विषयांवर उपसूचना मांडावयाची असल्यास ती शक्यतो सभेच्या किमान एक दिवस अगोदर लेखी स्वरूपात सादर करावी, जेणेकरून संबंधित मूळ प्रस्तावाशी तिची सुसंगती, नियमबद्धता आणि प्रशासकीय बाबी तपासून सभागृहापुढे योग्य स्वरूपात मांडता येतील. ऐनवेळी सादर करण्यात येणाऱ्या उपसूचना स्वीकारल्या जाणार नाहीत, याचीही सदस्यांनी नोंद घ्यावी, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
तसेच सभागृहात वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, असंसदीय अथवा आक्षेपार्ह भाषा, घोषणाबाजी, गोंधळ, महापौर यांचे निर्देशांचे उल्लंघन किंवा सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल असे वर्तन टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या. सदस्यांनी आपले मुद्दे वस्तुनिष्ठ, मुद्देसूद आणि सभागृहाच्या नियमांच्या चौकटीत मांडावेत. सभागृहातील शिस्तीचे गंभीर अथवा वारंवार उल्लंघन झाल्यास लागू नियम व तरतुदींनुसार संबंधित सदस्याविरुद्ध आवश्यक कारवाई करण्यात येऊ शकते, याकडेही लक्ष वेधण्यात आले.
नागरिकांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन विकासकामे व लोकहिताचे विषय प्रभावीपणे मार्गी लागावेत, यासाठी सभागृहातील प्रत्येक सदस्याने संयम, परस्पर सन्मान आणि नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली. महापालिका सभेचा वेळ नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि शहराच्या विकासाशी संबंधित निर्णयांसाठी अधिकाधिक परिणामकारकपणे वापरण्याच्या दृष्टीने सर्व सदस्यांनी सहकार्य व समन्वय राखावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

