दि.०२(पीसीबी)-इस्रायल-इराण संघर्ष आणि अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून त्याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत. जागतिक विमानसेवा विस्कळीत झाल्याने महाराष्ट्रातील तब्बल ९९ टक्के पर्यटन बुकिंग रद्द झाली आहेत. परिणामी राज्यातील पर्यटन व्यवसाय अक्षरशः कोलमडला असून उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसल्याची माहिती समोर आली आहे.
युद्धामुळे आखाती देशांकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या अनेक उड्डाणांवर परिणाम झाला आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत देशातील सुमारे १०० फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या होत्या, त्यापैकी ६२ आगमन तर ४२ प्रस्थान उड्डाणे होती. अचानक रद्द झालेल्या उड्डाणांमुळे शेकडो प्रवासी अडकले असून अनेकांना विमान कंपन्यांकडून रद्द झाल्याचे संदेश पाठवण्यात आले.
या संघर्षाचा परिणाम परदेशात गेलेल्या भारतीयांवरही झाला आहे. नाशिकचे सुमारे २०० भाविक मक्कामध्ये अडकले असून जिद्दा विमानतळ बंद असल्यामुळे त्यांना परतता येत नाही. जळगाव जिल्ह्यातील ३१ नागरिक दुबईत अडकले आहेत, तर पिंपरी-चिंचवडमधील माजी नगरसेविका सुमन नेटके यांच्यासह ४० ज्येष्ठ नागरिकांचा पर्यटन गटही दुबईत अडकून पडला आहे. उमरगा येथील दोन जोडपी, तसेच लातूर, पुणे, नाशिक आणि धाराशिव येथील २५ ते ३० विद्यार्थीही न्यू दुबई भागातील वसतिगृहात अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र संबंधित सर्व नागरिक सुरक्षित असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, दुबईत राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले असले तरी सततच्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ विश्वजीत पाटील यांच्या माहितीनुसार, युद्धामुळे परदेशात फिरायला जाणाऱ्या सुमारे ९० टक्के लोकांनी बुकिंग रद्द केली आहेत. त्यामुळे पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे.
सध्या मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण असून विमानसेवा पूर्ववत सुरू होईपर्यंत अडकलेल्या नागरिकांची प्रतीक्षा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत सरकारने विशेष उड्डाणांची व्यवस्था करून भारतीयांना लवकरात लवकर परत आणावे, अशी मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे.










































