अमेरिका-इराण संघर्ष तीव्र; भारतात हाय अलर्ट

2 Min Read

दि.०२(पीसीबी)-अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाने आता उग्र रूप धारण केले असून मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या क्षेपणास्त्रांनी परस्परांवर हल्ले सुरू असून इस्त्रायलवर सतत मिसाईलचा मारा होत आहे. इराणने अमेरिकेला प्रत्युत्तर देताना ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत, त्या ठिकाणांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती समोर आली आहे. तेहरानमध्ये अमेरिके व इस्त्रायलच्या हवाई कारवाया सुरू असल्याचेही वृत्त आहे. या वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाली असून दुबई विमानतळावर अनेक प्रवासी अडकले आहेत. मध्यपूर्वेत तणाव वाढल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर काही भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. श्रीनगर आणि लेह येथे काही ठिकाणी लोक रस्त्यावर जमल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर भारत सरकार सतर्क झाले असून केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना अलर्ट जारी केला आहे. संभाव्य हिंसाचार टाळण्यासाठी भडकाऊ भाषणे व अफवा पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत.

दिल्लीमध्ये यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली असून देशात कुठेही कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाकिस्तानमध्येही खामेनेई यांच्या मृत्यूनंतर हिंसाचार झाल्याची माहिती समोर आली असून केंद्रीय गुप्तचर यंत्रणा संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे.सध्या मध्यपूर्वेतील तणाव अत्यंत गंभीर टप्प्यावर पोहोचला असून जागतिक स्तरावर याचे परिणाम जाणवू लागले आहेत. परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष या संघर्षाकडे लागले आहे.

Share This Article