दिवाळी आणि सुट्ट्यांच्या हंगामामुळे खाजगी बसचा प्रवास महागला

0
796

मुंबई, दि.५ (पीसीबी) – दिवाळी आणि सुट्ट्यांच्या हंगामात रेल्वेपाठोपाठ एसटीदेखील फुल्ल होऊ लागल्याने प्रवाशांना खासगी बस तसेच लग्झरी सेवेचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र या खासगी बससेवेचे दर दिवाळीचा मुहूर्त साधून अव्वाच्या सव्वा वाढवण्यात आले आहेत. मुंबई ते गोवा, औरंगाबाद, कोल्हापूर आदी सर्वच मार्गांवर खासगी बससेवांचे भाडे दीडपट ते दुप्पट वाढवण्यात आले आहेत. 

सण, सुट्ट्यांच्या हंगामात खासगी बसचालकांकडून जादा दर आकारले जाण्याची तक्रार कायम असते. एसटीने गतवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीत १० टक्के भाडेवाढ केली आहे. मात्र लांब पल्ल्याच्या एसटी गाड्यांचे आरक्षित तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांना खासगी बससेवेकडे वळावे लागत आहे. खासगी बससेवांना तात्पुरत्या कालावधीसाठी एसटीच्या तिकिटांपेक्षा दीडपट अधिक भाडे आकारण्यास मुभा आहे. मात्र सर्वच मार्गावर हंगाम नसतानाच्या कालावधीत आकारले जाणाऱ्या तिकिटाच्या तुलनेत सध्याचे भाडे दुप्पटीवर पोहोचले आहे