पोलिसांच्या मारहाणीत ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू; दोन पोलीस हवालदारांवर हत्येचा गुन्हा

0
1274

पंढरपुर, दि. ५ (पीसीबी) – गाण जोरात लावल्याच्या कारणावरुन पोलिसांनी केलेल्या जबर मारहाणीत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि.४) माढा तालुक्यात घडली. यावेळी संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्तांनी पोलिसांवर कारवाईची मागणी करत मृत इसमाचा मृतदेह पोलीस चौकीत आणून ठेवला.

प्रदीप कल्याण कुटे (वय २४, उस्मानाबाद) असे मृत ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार दशरथ कुंभार आणि दीपक क्षीरसागर या दोघांवर कलम ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी प्रदीप कुटे हा माढा तालुक्यातील केवडच्या बबनराव शिंदे साखर कारखान्यासाठी धानोरे येथून ऊस घेऊन निघाला होता. त्याच्यासोबत ट्रॅक्टर ट्रॉलीत त्याची आई देखील होती. मानेगाव येथे पोहोचले असता टेपरेकॉर्डरवर गाणे जोरात लावल्याच्या कारणावरुन पोलिसांनी त्याला अडवले. यानंतर पोलिसांनी प्रदीपला चौकीत नेऊन त्याला मारहाण केली. हा प्रकार सुरु असताना त्याची आई ट्रॅक्टर ट्रॉलीत बसली होती.

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रदीपला तातडीने माढ्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाला, असा आरोप प्रदीपच्या नातेवाईकांनी केला आहे. संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रास्ता रोको करुन संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत रास्ता रोको देखील केला. रात्री उशिरापर्यंत प्रदीपच्या नातेवाईकांनी माढा पोलीस ठाण्यात ठिय्या मारला होता. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी पोलीस ठाण्यात जाऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. आणि संबंधीत दोन्ही पोलीस हवालदारांवर हत्येचा गुन्हा दाखल केला.