चाकण येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाची किराणा दुकानावर कारवाई

0
223

95 हजारांच्या गुटख्यासह सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

चाकण, दि. ८ (पीसीबी) – चाकण येथे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका किराणा दुकानावर कारवाई केली. यात पोलिसांनी एकाला अटक केली असून 95 हजारांच्या गुटख्यासह सव्वाआठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. 7) दुपारी सव्वा एक वाजता चाकण मार्केटयार्ड येथे केली.

रवाराम रताराम चौधरी (वय 39, रा. चाकण) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह हनुमान जाट (रा. महाळुंगे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई अशोक गारगोटे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चौधरी याचे चाकण मार्केट यार्ड येथे सिरवी ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान आहे. त्याने दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी दुकानावर छापा मारून कारवाई केली.

या कारवाईमध्ये 95 हजार 734 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू तसेच एक कार आणि मोबाईल फोन असा एकूण आठ लाख 25 हजार 737 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.