ठरलेले लग्न मोडण्याचा प्रयत्न करत तरुणीचा विनयभंग…

0
284

चिखली, दि. ११ (पीसीबी) – तरुणीचे लग्न ठरल्यानंतर तरुणीच्या व नियोजित वराच्या घरच्यांनी लग्नास नकार द्यावा यासाठी एका तरुणाने प्रयत्न केले. तसेच संबंधित तरुणीवर आपले प्रेम असल्याचे म्हणत तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 9) चिखली परिसरात घडली.
दत्ता कुंभार (रा. पांडव नगर भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 33 वर्षीय तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्ता आणि पीडित तरुणी हे वर्गमित्र आहेत. तो फिर्यादी तरुणीच्या घरी नेहमी येत-जात असे. एक महिन्यापूर्वी फिर्यादी तरुणीचे लग्न ठरले. याबाबत तिने वर्गमित्र आरोपी दत्ता याला सांगितले. मात्र आलेले स्थळ चांगले नाही. त्यास तुम्ही नकार द्या, असा दबाव दत्ता हा पीडित तरुणीच्या कुटुंबीयांवर टाकू लागला. तसेच फिर्यादीच्या होणाऱ्या पतीस व नातेवाईकांना संपर्क साधून पीडित तरुणीचे आणि माझे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. त्यामुळे तुम्ही लग्नाला नकार द्या, असे खोटे सांगून तरूणीची बदनामी केली.

रविवारी पीडित तरुणी आपल्या घरच्यांसमोर बाहेर जात असताना आरोपी दत्ता याने त्यांचा रस्ता अडविला. त्यामुळे पीडित तरुणी तिथेच उभी असताना तिचा हात पकडून सोसायटीच्या लिफ्टमध्ये जबरदस्तीने नेऊन, ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, असे म्हणत तरुणीचा विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक रघुनंदन भोये तपास करीत आहेत.