पुण्यातील महिला पोलिसांसाठी खुशखबर! आता महिला पोलिसांना १२ नाही तर फक्त ‘एवढ्याच’ तासांची ड्युटी

0
394

पुणे, दि.२५ (पीसीबी) : पुणे शहर पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण लवकरच कमी होणार आहे. कारण सोमवारपासून महिला पोलिसांना केवळ आठ तासच काम करावे लागेल. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. त्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे शहर पोलीस दलातील हजारपेक्षा जास्त महिला कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

यापूर्वी अमरावती आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांच्या कामाचे तासही कमी करण्यात आले होते. नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तास ड्युटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी इतर पोलिस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा, अशी सूचना केली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण आणि अमरावती पोलिसांनीही महिला पोलिसांसाठी आठ तासांची ड्युटी जाहीर केली होती.

पोलीस दलात कर्तव्य करीत असलेल्या महिलांना बारा तास काम करावे लागते. महिला पोलिसांना कामाबरोबरच कौटुंबीक जबाबदारी पार पाडावी लागते. अनेक वेळा सण-उत्सव बंदोबस्त गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून अनेक वेळा 12 तासापेक्षा जास्त कर्तव्य बजावावं लागत. त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक जबाबदारीवर आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलीस विभागाने महिलांच्या बारा तासाच्या ड्युटीचा कालावधी आता आठ तास केला आहे, अशी माहिती अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी दिली होती. आता महिलांना चार तासाची सवलत मिळाल्याने महिला कर्मचाऱ्यांमध्ये मोठा आनंद निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले होते.

महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याचा निर्णय अतिशय चांगला आहे. पोलीस महासंचालक पांडे आणि पोलीस दलानं केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतेय, असं राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. महिलांबद्दल आणि कामांबद्दल त्यांना जो ऑलराऊंडमध्ये रोल प्ले करावा लागतो याची जाणीव होत आहे. हे आपल्या सर्वांच्या वर्तनात येत आहे. असाच सर्व विचार इतर मंडळींनी करावा, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. सर्व पोलीस ठाण्यांनी हा उपक्रम राबवावा, या निर्णयामुळे महिला पोलिसांना दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.